शिवसेनेच्या भुजात बळ आवश्यक

beni-prasad
छगन भुजबळ शिवसेनेत येणार अशी बातमी प्रसिद्ध होताच भुजबळ यांनी या बातमीचा इन्कार केलाच पण शरद पवार यांनीही इन्कार केला. भुजबळ काही शिवसेनेत जाणार नाहीत. त्यांचे राष्ट्रवादीत छान चालले आहे असे पवार आणि भुजबळ या दोघांनीही स्पष्ट केले पण यात काही तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांनी अजून भुजबळांना शिवसेनेत घेणारच नाही असे स्पष्ट केलेले नाही पण त्यांची फार इच्छा आहे असे दिसत नाही. ते काहीही असले तरीही आज भुजबळ यांनी शिवसेनेत यावे अशी गरज आहे. ती शिवसेनेचीही गरज आहे आणि भुजबळांचीही गरज आहे. भुजबळ राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुखात नाहीत. कदाचित ते मनाने शिवसेनेत गेलेही असतील. या संंबंधात एक घटनेची आठवण करून द्यावीशी वाटते. पवारांनी छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांची लोकसभेत फार गरज आहे असे भासवले. खरे तर ही त्यांना संपवण्याची सुरूवात होती. त्याची जाणीव भुजबळांच्या येवल्यातल्या अनुयायांना झाली आणि त्यांनी भुजबळांच्या उमेदवारीच्या घोषणे दिवशी बंद पाळला. राज्यात आजवर असा प्रकार कधी घडला नव्हता. अनेक नेते उमेदवारी मिळावी म्हणून जीवाचे रान करतात आणि त्यांचे समर्थकही उमेदवारी मिळाल्यास आनंद साजरा करतात. पण येवल्यात तर उमेदवारी जाहीर झाल्यावर सुतक पाळले जात होते. ते सुतक आणि तो बंद काही भाजपा-सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलेला नव्हता. तो राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाळला होता.

कारण भुजबळांना दिलेली ही उमेदवारी त्यांना राज्याच्या राजकारणातून बाद करण्यासाठी आहे याची जाणीव राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना झाली होती आणि ते त्यांना मान्य नव्हते. राज्यातल्या राजकारणातली अजित पवारांच्या मार्गातली अडचण दूर करण्यासाठी भुजबळांना केन्द्रात पाठवले जात होते. पवारांच्या या राजकारणाला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी छान उत्तर दिले होते. आजवर पवारांच्या बाबतीत असे कधी घडले नव्हते. पण येवल्यात ते घडले. शरद पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांना बुद्धीबळातल्या प्याद्याप्रमाणे सतत खेळवण्याच्या प्रवृत्तीला त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे उत्तर दिले होते. आजवर त्यांचा हा खेळ पक्षातले नेते आणि सामान्य कार्यकर्तेही केवळ पहात होते पण आता त्यांना या सततच्या डावपेचांचा उबग आला. येवल्यातला बंद भुजबळांना पसंत होता की नाही हे माहीत नाही पण त्यांना तो मनातून आवडला असणार. अशा स्थितीत राज्यात एवढे मोठे राजकीय परिवर्तन घडत असताना ते तरीही राष्ट्रवादी कॉंग्रेसला चिकटून बसतील अशी शक्यता नव्हतीच.

आपल्या कार्यकर्त्यांच्या बंदचा संकेत त्यांनाही कळला. आगामी काळात पवारांनी फेकून दिलेला पेपर नॅपकीन म्हणून जगण्यापेक्षा आपल्या भवितव्याचा काहीतरी विचार केला पाहिजे असे त्यांना वाटले असेल तर त्यात काही चूक नाही. या पार्श्‍वभूमीवर ते शिवसेनेत येणार अशी बातमी एका अग्रगण्य दैनिकाने पेरली. ही बातमी चुकीची आहे असे त्या बातमीतच भुजबळांनी म्हटले पण ती बातमी अगदीच काही निराधार नव्हती. कारण ही बातमी, तिचा भुजबळ आणि पवारांनी केलेला खुलासा तसेच त्यावरची गरमागरम चर्चा हा सारा प्रकार संपल्यावर मनोहर जोशी यांनी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. या गौप्यस्फोटानंतरही भुजबळ आपल्या शब्दावर ठाम राहिले. ते ठाकरे यांच्या संपर्कात होते पण ते स्वत:साठी नाही तर आपल्या सहकार्‍यांसाठी होते. त्यांचे काही नजिकचे कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. भुजबळांनी म्हटल्याप्रमाणे ते शिवसेनेत यायला उत्सुक नाहीत असे मानले तरीही ते शिवसेनेत येेणे त्यांच्यासाठी आणि शिवसेनेसाठीही गरजेचे आहे. त्यास भाजपा आणि शिवसेनेतली रस्सीखेच कारणीभूत आहे. या युतीत भाजपाचा वरचढपणा करण्याचा प्रयत्न चालला आहे. आजवर शिवसेनेने या युतीत मोठा भाऊ म्हणून राज्य केले पण आता भाजपाला हा मान हवा आहे. मोदी लाट, लोकसभेचे निकाल आणि शिवसेनेचे घटते बळ या मुद्यावरून भाजपाने युतीत अधिक जागांचा दावा करायला सुरूवात तर केली आहेच पण वेळ पडल्यास मुख्यमंत्रीही भाजपाचा असावा असा जोर लावायला सुरूवात केली आहे.

या ओढाताणीत शिवसेनेचे नेते भाजपावर दबाव आणत आहेत पण शिवसेना आणि भाजपा यांच्या तुलनेत शिवसेनेला आपले पारडे जड असल्याचे दाखववायचेच असेल तर सेनेला आपल्या जमेच्या बाजू समोर मांडाव्याव लागतील. सध्याचे राजकारण ओबीसी मतांच्या प्रभावाखाली आहे. यावेळी युतीला १९९५ प्रमाणेच याच वर्गाचा पाठींबा मिळणार आहे. पण हा पाठींबा पदरात पाडून घेणारा एकही प्रभावी ओबीसी नेता भाजपातही नाही आणि शिवसेनेतही नाही. भाजपात मुंडे होते. ते गेले, आता राज्यात ज्यांना ओबीसी नेता म्हणून ओळखले जाते असे एकमेव नेते आहेत भुजबळ. राज्यातली ओबीसी मते पदरात पाडून घेण्यासाठी तर शिवसेनेला भुजबळांची गरज आहेच पण महायुतीतही भाजपावर मात करण्यासाठी त्यांची गरज आहे. आज काहीही खुलासे होत असले तरीही एक दिवस छगन भुजबळ सेनेत येण्याची किंवा सेनेला मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment