रशियाबरोबरचे व्दिपक्षीय संबंध अधिक भक्कम करणार – मोदी

modi
फोर्टालेझा – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री भेट घेतली. पुतिन यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे दोन्ही नेत्यांची नियोजित भेट पुढे ढकलली गेली होती.

रशि्या हा भारताचा जुना आणि जवळचा मित्र आहे. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये जवळपास चाळीस मिनिटे चर्चा झाली.

अण्विक, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात रशियाबरोबरचे व्दिपक्षीय संबंध अधिक भक्कम करणार असल्याचे नरेंद्र मोदींनी या बैठकीत सांगितले. यावर्षी डिसेंबर महिन्यात पुतिन वार्षिक परिषदेसाठी भारतात येणार आहेत. त्यावेळी कुडानकुलम अणूऊर्जा प्रकल्पाला भेट देण्याचे मोदींनी त्यांना निमंत्रण दिले.

भारत-रशिया संबंधांबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, भारतात एखाद्या लहान मुलाला विचारले की, भारताचा जवळचा मित्र कोण तर, तो चटकन रशियाचे नाव घेईल. भारताच्या संकटकाळात रशिया नेहमीच भारताच्या मदतीसाठी उभा राहिला आहे असे सांगत आगामी काळात भारत-रशिया संबंध अधिक बळकट करण्याला आपले प्राधान्य रहाणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.

भारतातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी रशियामध्ये जातात त्यामुळे व्हिसा धोरणात उदारता आणणे आवश्यक असल्याचे मोदींनी या बैठकीत सांगतिले. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल पुतिन यांनी मोदींचे कौतुक केले.

Leave a Comment