टर्मिनेटर या चित्रपटाच्या सर्वच भागांनी प्रेक्षकांवर घातलेली मोहिनी अजूनही कायम आहे. टर्मिनेटर च्या दुसर्या भागात पाहिजे तो आकार घेऊ शकणारे रोबो दाखविले गेले होते. एमआयटीच्या संशोधकांनी आता हे आकार बदलणारे रोबो प्रत्यक्षात आणण्याचे काम हाती घेतले असून त्यात त्यांना चांगले यश मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
टर्मिनेटर प्रमाणे आकार बदलू शकणारे रोबो
टर्मिनेटर टू मधील टी १००० रोबोप्रमाणे हे रोबोही हवे तेव्हा द्रवरूपात जाऊ शकणार आहेत व त्यानंतर पुन्हा मूळ आकारात येऊ शकणार आहेत. लिक्वीड फॉर्ममध्ये ते अगदी बारीकशा छिद्रातूनही आतमध्ये शिरू शकणार आहेत. यांचा उपयोग प्रामुख्याने सर्जिकल कारणांसाठी केला जाणार असल्याचे समजते.
म्हणजे एखाद्या माणसाच्या शरीरात नक्की कुठे डॅमेज झाले आहे याचे निदान करून ते डॅमेज दुरूस्त करण्याचे काम हे रोबो बजावतील. हा रोबो शरीराच्या अगदी बारीकशा छिद्रातून शरीरात जाईल व अन्य कोणत्याही अवयवांना अथवा रक्तवाहिन्यांना कोणतीही इजा न करता जेथे डॅमेज झाले आहे तो भाग दुरूस्त करेल. हे रोबा बनविण्यासाठी खास प्रकारचे मटेरियल विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे हे रोबो आवश्यक तेव्हा लिक्विड फॉर्ममध्ये जातील व पुन्हा मूळपदावर येतील.
इमारत कोसळणे, पूर, मलब्यात अडकलेले लोक यांच्या सुटकेसाठीही या रोबोचा वापर शक्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. बोस्टन डायनामिकस या रोबो कंपनीच्या सहाय्याने हे रोबो विकसित केले जात आहेत. डिफेन्स अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीच्या केमिकल रोबो प्रोग्रामखाली हा प्रकल्प आकारास येत आहे.