ऑस्ट्रेलियात ओझाचे सलग तिसरे शतक

naman
ब्रिस्बेन – नमन ओझाचे शानदार शतक तसेच उमेश यादवच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱया अनधिकृत कसोटीत खेळाच्या तिसऱया दिवशी भारत अ ने पहिल्या डावात 501 धावा जमवित ऑस्ट्रेलिया अ वर 78 धावांची आघाडी मिळविली. या मालिकेतील ओझाचे हे सलग तिसरे शतक आहे. उमेश यादवने 90 धावा जमविल्या.

चार दिवसांच्या या सामन्यातील खेळाच्या तिसऱया दिवशी भारत अ ने 3 बाद 165 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. बाबा अपराजित आणि मनोज तिवारी हे दोन फलंदाज लवकर बाद झाले. अपराजितने 3 चौकारांसह 28 तर तिवारीने 10 चौकारांसह 63 धावा जमविल्या. नमन ओझा आणि रायडू यांनी सहाव्या गडय़ासाठी 69 धावांची भागीदारी केली. रायडूने 2 षटकार आणि 4 चौराकांसह 40 धावा फटकाविल्या. रायडू बाद झाल्यानंतर ओझाला मिश्राने बऱयापैकी साथ दिली. या जोडीने सातव्या गडय़ासाठी 80 धावांची भर घातली. मिश्राने 6 चौकारांसह 36 धावा जमविल्या. नमन ओझाने 134 चेंडूंत 3 षटकार आणि 18 चौकारांसह 110 धावा फटकाविल्या. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ओझाने पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱया डावात शतक झळकविले होते. उमेश यादवच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारत अ ला 500 धावांचा टप्प ओलांडता आला. यादवने 66 चेंडूंत 5 षटकार आणि 11 चौकारांसह 90 धावा झोडपताना बुमराह समवेत शेवटच्या गडय़ासाठी 82 धावांची भर घातली. तिसऱया दिवसाअखेर भारत अ चा पहिला डाव 132.2 षटकांत 501 धावांत आटोपला.

ऑस्ट्रेलिया अ तर्फे सेअर्सने 84 धावांत 5 तर कटिंगने 100 धावांत 4 गडी बाद केले. या कसोटीतील खेळाचा एक दिवस बाकी असून भारत अ चा संघ विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेल.

Leave a Comment