मिरचीवर प्रक्रिया करणे सोपे

chilli
शेतकर्‍यांना ङ्गारसे कष्ट न करता प्रक्रिया करता येणारा शेतीमाल म्हणजे मिरची. मिरची हे असे एक पीक आहे की, ते काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सार्‍या प्रांतात खाल्ली जाते. आवडीने खाल्ली जाते. भारतात एक मोठा समाज असा आहे की, ज्याचे जेवण कमी-अधिक प्रमाणात मिरचीशिवाय होत नाही. म्हणजे मिरचीला प्रचंड मोठे मार्केटिंग आहे. ही मिरची विविध प्रकारांनी खाल्ली जाते. मी या ठिकाणी ढोबळी किंवा सिमला मिरचीची चर्चा करणार नाही. तिखट मिरचीची चर्चा करणार आहे. सिमला मिरचीचे मार्केटिंग वगैरे सगळे वेगळे आहे. तेव्हा तिला थोडे बाजूला ठेवू. आपल्या नेहमीच्या कोल्हापूरच्या लवंगी मिरचीची चर्चा करू. मिरचीचा वापर करण्याचा पहिला प्रकार म्हणजे हिरवी कच्ची मिरची वापरणे. तशीच लाल मिरचीही वापरली जाते. दुसरा प्रकार म्हणजे लाल मिरची वाळवून विकणे. हिरवी किंवा लाल मिरची कच्च्या स्वरुपात बाजारात नेऊन विकण्यापेक्षा लाल मिरची वाळवून विकण्याने चार पैसे जास्त मिळत असणार. तेव्हा मिरची लावणार्‍या शेतकर्‍यांनी काही प्रमाणात का होईना वाळलेली लाल मिरची विकण्याचा प्रयत्न करावा.

मिरचीवर करायची त्यापेक्षा सोपी प्रक्रिया म्हणजे तिखटाची पावडर तयार करणे. वाळलेली लाल मिरची विकण्यापेक्षा पावडर (तिखट) विकणे जास्त ङ्गायद्याचे. स्वत:च्या शेतात पिकणार्‍या थोड्याशा मिरच्या असतील तर घरीच उखळात त्या मिरच्या कुटून आपण आपल्यापुरते तिखट तयार करतोच. पण त्याचसोबत आपल्याकडं जरा जास्त मिरच्या असतील तर त्याचंही घरीच तिखट तयार करून प्लॅस्टिकच्या पिशव्यात पॅक करून आपण विकू शकतो. त्याची विक्री आठवड्याच्या बाजारात करता येईल. दिवसभर विकत बसावे लागेल एवढा माल नसेल तर बाजारातल्या एखाद्या व्यापार्‍याला ते तिखटाचे पुडे विकून टाकावेत. हा तिखटाचा व्यापार थोडा योजनापूर्वक केला तर तिखट कुटण्यासाठी मिरची कांडप यंत्र घेता येईल. बर्‍याच गावात आता हे यंत्र आलंच आहे. आपल्या गावात किंवा जवळपासच्या मोठ्या गावात मिरची कांडप यंत्र असेल तर गावातल्या एखाद्या तरुणानं गावातल्या लाल मिरच्या गोळा करून त्या यंत्रावर तिखट तयार करावे. ते आठवड्याच्या बाजारात विकावे. ङ्गार भांडवल लागत नाही. कसलेच अवघड तंत्र त्याला लागत नाही.

बाजारात जाऊन तिखटाचे भाव आणि आपल्या मिरच्यांना मिळणारा भाव यांची तुलना करून बघा. हा व्यवसाय आपणच केला तर आपल्याला किती पैसे मिळेल याचा अंदाज घ्या. ग्रामीण भागात एम.ए., बी.एड्. अशा पदव्या घेतलेले अनेक तरुण आहेत. एखाद्या विना अनुदानित संस्थेत दरमहा हजार, बाराशे रुपयांची नोकरी मिळेल का याची वाट पहात असे हजारो तरुण बसलेले आहेत. अशा तरुणांनी हे लक्षात ठेवावे की, आपल्याला अशा नोकर्‍यांची वाट पहात बसण्याची गरज नाही. त्यांनी असा एखादा उद्योग केला तर त्यांना त्या शिक्षकी पेशापेक्षा किती तरी जास्त पैसे मिळू शकतात. माझ्या पाहण्यात अशा तरुणांची अनेक उदाहरणे आहेत.

ठेच्याला भारतभरात मार्केट

मिरचीवरची पुढची सोपी प्रक्रिया म्हणजे ठेचा तयार करणे. आपण महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे हिरव्या मिरचीचा ठेचा जास्त वापरतो. पण सध्या सर्वत्रच लाल मिरचीचा वर्‍हाडी ठेचा जास्त लोकप्रिय झाला आहे. ठेचा तयार करायला ङ्गार काही ज्ञान लागत नाही. ङ्गार काही अवजड यंत्रं आणावी लागत नाहीत. आपण पिढ्यान् पिढ्या वर्षानुवर्षे ठेचा तयार करीत आलो आहोत. तेव्हा आपल्या हिरव्या किंवा लाल मिरच्या बाजारात नेऊन विकण्यापेक्षा त्यांचा ठेचा करून मग विकावा. आपले ठेचा तयार करण्याचे तंत्र ठरलेले आहे. पण त्यात काही बदल करून पहावा. लाल वर्‍हाडी ठेच्यात लिंबू पिळलेले असते. हा वर्‍हाडी ठेचा छोट्या पुड्यात पॅक करून त्यावर उत्तम रंगीत चित्र काढून तो १०० ग्रॅमला १० रुपये असा दरानं विकला जातो. यातला ङ्गायदा आपल्या लक्षात येत नाही. मिरचीला ङ्गार तर १० रुपये किलो भाव येतो. काही वेळा मिरच्या कमी असतील किंवा बाजारात त्यांची आवक कमी झाली असेल तर ङ्गार तर १५ ते २० रुपये प्रति किलो भाव मिळतो. असा चांगला भाव मिळण्याचे प्रसंग कमीच असतात. पण हीच मिरची ठेचून विकली की ८० रुपये किंवा ९० रुपये किलो दरानं विकली जाते. हा हिशेब आपल्या लक्षात का येत नाही ? लक्षात येत नाही म्हणून आपण मागे आहोत. अनेक शेतकर्‍यांंशी यावर बोललो पण वारंवार हाच प्रश्‍न विचारला जातो, ‘मार्केटिंग’ कोठे आहे ? खरे तर हा प्रश्‍न वेड्यासारखा आहे. मार्केट म्हणजे काय आभाळातला स्वर्ग आहे का ? तो सापडणे म्हणजे काय कर्म कठीण आहे ? आपण आपल्या घरी बसूनच, मार्केट कोठे आहे ? असा प्रश्‍न विचारल्याने मार्केट सापडणार आहे का ?

मार्केट माहीत नाही एवढ्या एका प्रश्‍नाजवळ आपले आपल्या उत्कर्षाचे सगळे प्रयत्न थांबणार असतील तर स्वर्गातला देव सुद्धा आपलं कल्याण करू शकणार नाही. आपण अनेक वस्तू खरेदी करायला जिथे जातो ते मार्केटच आहे ना ? मग त्याच मार्केटमध्ये गिर्‍हाईक म्हणून जाण्याऐवजी विक्रेता बनून जा. अशी भूमिका बदलली की, आपण व्यापारी होतो. सुरुवातीला आपल्याला लाज वाटते. एखाद्या वस्तूची विक्री करताना एखादा मोठा व्यापारी आपला माल घ्यायला नकार देतो. तिथे निराश न होता, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागेल. ही चिकाटी ङ्गार अवघड नसते. वस्तू विकायला जातानाच आपल्यात निराशेच्या क्षणांनाही तोंड द्यावे लागणार आहे असे आधीच गृहित धरावे. ही तशी सोपी गोष्ट आहे. पण ही सोपी गोष्टच आपल्या शेती मालाला चार पैसे जादा मिळवून द्यायला कारणीभूत ठरणार आहे. थोडे साहस असेल तर एखाद्या शहरात जाऊन स्वत: घरोघर जाऊन विक्री करावी. मार्केट सापडत नाही म्हणजे काय ? महाराष्ट्रात सध्या गुजरातच्या कच्छ भागातला हिरवा ठेचा विकला जात आहे. विदर्भात तयार होणारा माल वर्‍हाडी ठेचा भोपाळ आणि लंडनमध्ये मार्केट काबीज करीत आहे. सोलापूरची भाकरी अमेरिकेत विकली जात आहे. गुजरातच्या ठेच्याला महाराष्ट्रातले मार्केट सापडते अन् महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनाच महाराष्ट्रातले मार्केट कसे सापडत नाही ? सापडू शकते, पण आधी शोधावे लागेल. शोधल्याशिवाय काहीच सापडत नसते. शेतकर्‍यांच्या मुलांनी थोडं आपल्या कोशाबाहेर येऊन व्यापार करायला शिकलं पाहिजे. ठेचा तयार करा, पॅक करा आणि विकायला शिका. बघा वर्षानुवर्षांचं दारिद्य्र हटतं की नाही ?

Leave a Comment