राज्यात वीजनिर्मितीची’ आणीबाणी’

electric
औरंगाबाद – राज्यातील वेगवेगळ्या सात वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये एक ते १२ दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने महाराष्ट्रात वीजनिर्मिती धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने पवार येथे आले होते. मेळाव्यात मराठवाडय़ातील ‘ड’ वर्गापर्यंतच्या गावांची भारनियमनातून मुक्तता व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. मात्र, अशी मागणी पूर्ण करणे सध्या शक्य नसल्याचे पवार यांनी सांगितले.त्यावेळी त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले , धरणांमध्ये झपाटय़ाने कमी होत असलेले पाणी आणि कोळशाचा अपुरा पुरवठा यामुळे वीजनिर्मितीवर कमालीचा फरक पडत आहे. कोयनेत पाणी कमी झाल्यामुळे, तर दाभोळ प्रकल्पाला गॅस अपुरा मिळत असल्याने हवी तेवढी वीजनिर्मिती होत नाही. कोळशाचा अपुरा पुरवठाही यास कारणीभूत आहे. राज्यातील वेगवेगळ्या सात वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये एक ते १२ दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातून हवी तेवढी वीज उपलब्ध होत नाही. त्यातच कोळशाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांशी या अनुषंगाने चर्चा झाली असून केंद्रीय ऊर्जा व कोळसा विभागाचे राज्यमंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार आहोत. भारनियमन शिथिल करता येणे शक्य नाही, असे सांगताना पवार यांनी कोळसा आणि अपुऱ्या पावसाचे कारण त्यासाठी दिले .

Leave a Comment