मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गांना जातीचे दाखले विनाविलंब द्यावेत – शिवाजीराव मोघे

shivaji-moghe
मुंबई : मुस्लिम ओबीसी, एससी, एनटी आदी मुस्लिम मागास प्रवर्गातील पात्र नागरिकांना जातीचे दाखले विनाविलंब देण्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना सूचित करण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांच्या विनंतीवरुन मंत्री श्री. मोघे यांच्या मंत्रालयीन दालनात सोमवारी याबाबत बैठक झाली. बैठकीस मंत्री नसीम खान यांच्यासह अल्पसंख्याक विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना, सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव स्मिता रानडे, अखिल भारतीय मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी, उपाध्यक्ष फाजल अन्सारी, सदस्य सर्वश्री मुसा मुर्शद, मिर्जा अब्दुल कय्युम, मेहमूद परवेज, अब्दुल हमीद अन्सारी आदी उपस्थित होते.

मुस्लिम समाजातील ओबीसी, एससी, एनटी आदी प्रवर्गातील नागरिकांना पात्र असुनसुद्धा जातीचे दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत, असे याप्रसंगी श्री. खान यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील विविध भागातून याबाबत तक्रारी आहेत. पात्र मुस्लिम मागासांना दाखले मिळण्यात विलंब होतो अशाही तक्रारी आहेत. तेव्हा अशा तक्रारींची चौकशी व्हावी आणि पात्र मुस्लिम मागासांना जातीचे दाखले तातडीने मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी. मुस्लिम ओबीसींना जातीचा दाखला मिळण्यासाठी १९६७ पूर्वीचे पुरावे सादर करावे लागतात. अनेक मुस्लिम ओबीसींच्या शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख नसल्याने ते सुद्धा पात्र असुनही या सवलतींपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे १९६७ च्या अटीची पुनर्पडताळणी करण्यात यावी.

पात्र मुस्लिम मागासांना जातीचे दाखले देण्याबाबत स्थानिक अधिकारी अडथळा करीत असल्यास त्याबाबत संबंधितांनी तक्रार करावी; त्याची शहानिशा करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे याप्रसंगी मंत्री श्री. मोघे यांनी सांगितले. पात्र मागास मुस्लिमांना जातीचे दाखले देणे तसेच त्यांची पडताळणी करणे यातील अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले. ओबीसींसाठी असलेल्या १९६७ पूर्वीचा पुरावा सादर करण्याच्या अटीबाबत विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन नियमात दुरुस्ती करण्याबाबत याप्रसंगी निर्णय घेण्यात आला. तसेच दाखल्यासाठी संबंधितांच्या पूर्वीच्या वास्तव्याच्या पुराव्याऐवजी त्याच्या सध्याच्या रहिवासाचा पुरावा ग्रहित धरण्याबाबतही याप्रसंगी चर्चा करण्यात आली.

Leave a Comment