भीक मागण्याची सवय

poor
भारतात भिकार्‍यांची संख्या मोठी आहे. खरे तर भीक मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. १९५९ साली तसा कायदा मंजूर झाला आहे पण, आपल्या देशात अनेक लोक काही कारण नसताना भीक मागत असतात. काही भिकारी तर लक्षाधीश आहेत. मुंबईत अंधेरीच्या एका चौकात एका भिकार्‍याची सखोल चौकशी केली असता त्याच्या मालकीचा एक फ्लॅट असल्याचे आणि सोलापूर जिल्ह्यात त्याची चाळीस एकर जमीन असल्याचे दिसून आले. खरे तर त्याला भीक मागण्याची काही गरज नाही पण काम करून मिळणार्‍या पैशापेक्षा भीक मागून जास्त पैसे मिळतात असे त्याला लक्षात आले होते आणि त्याने हाच धंदा करायचे ठरवून अंधेरीच्या या चौकातच भीक मागण्याचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्या भागातल्या दादाला त्याने मोठी बिदागी दिली होती. अशा भिकार्‍याकडे पाहून मनाला टोचणी लागते. भारत देश जगातली महाशक्ती होण्याचे दावे करीत आहे पण या देशात दैन्य आणि दारिद्य्राच्या कितीतरी खुणा सातत्याने दिसत असतात.

कोणी परदेशी पर्यटक आले आणि ते देशात फिरायला लागले की, त्यांना अनेक ठिकाणी भिकारी फार दिसायचे. आताही दिसतात पण पूर्वी त्यांची संख्या फारच होती. जागोजाग भिकारी आणि हात पसरणारे लोक दिसत, त्यातले अनेक भिकारी हॉटेलांत जाऊन शिळेपाके अन्न गोळा करून खात असत तर अनेक भिकारी घरांच्या समोर दारात उभे राहून याचना करीत असत. आपल्या देशावरचे ते लांच्छनच होते. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तर भिकार्‍यांच्या रांगा लागलेल्या असतात. त्या पूर्वी फार होत्या. आता आपल्या देशात बरीच प्रगती झाली आहे. पूर्वी हा देशच जगात अनेक ठिकाणाहून धान्य मागून आणत असे. भारताचा भिकेचा वाडगा जगासमोर सातत्याने पसरलेला असे. पण १९६० च्या दशकात हरित क्रांती झाल्याने आपला हात आता धान्य मागण्यासाठी पसरलेला नाही तर तो आता अनेक देशांना धान्य देण्यासाठी पुढे आलेला आहे. आता एवढी परिस्थिती नक्कीच सुधारली आहे की, या देशात आता भिकार्‍यांची संख्या कमी झाली आहे. आता देशात असे लोक नक्कीच राहिलेले नाहीत की ज्यांना पोटात घालायला अन्नच मिळत नाही. आपल्या देशातले आत्यंतिक दारिद्य्र संपले आहे. जगण्याची धडपड करणार्‍याला कोठून ना कोठून अन्न मिळतेच. ज्या ठिकाणी आत्यंतिक दारिद्य्र माजलेले असते त्या ठिकाणी साम्यवाद फोफावतो. भारतात असे दारिद्य्र कमी झाल्याने साम्यवादी चळवळही संपली आहे.

२०११ साली करण्यात आलेल्या जनगणनेत देशातल्या भिकार्‍यांची संख्या घटल्याचे दिसून आले आहे. २००१ सालच्या जनगणनेत देशात ६३ लाख भिकारी आढळले होते पण २०११ सालच्या जनगणनेत त्यांची संख्या ४१ टक्क्यांनी कमी झाली आहे. ती आता ३७ लाखावर आली आहे. आपल्या देशात अवतरलेल्या समृद्धीचे हे लक्षण आहे आणि ही गोष्ट कोणालाही नाकारता येणार नाही. ज्याला कष्ट करून पोट भरण्याची इच्छा आहे त्याला काम मिळणार नाही आणि पोट भरण्याएवढी मजुरी मिळणार नाही असे आता दिसत नाही. उलट श्रम करणारांना आता तुलनेने जादा रोजगार मिळत आहे. खरे तर आपल्या देशात आता अशी चांगली स्थिती आली आहे की, कष्ट करणारांना काम मिळू शकते पण कष्ट करणारांची संख्या कमी होत आहे. उलट काल जे लोक शारीरिक कष्टावर जगत होते ते आता कष्ट करण्याची गरज नसणारा रोजगात शोधत आहेत.

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही प्रक्रिया सांंगताना आपल्या अंदाजपत्रकीय भाषणात असे नमूद केले आहे की, देशातला गरीब वर्ग हा मध्यमवर्गीय होण्याची धडपड करीत आहे. तसे झाले पाहिजे आणि त्यांना मध्यमवर्गीय होता आले पाहिजे. तसे होत आहे आणि काल जे लोक निव्वळ भिकेवर जगत होते ते आता जमेल तसे कष्ट करण्याची तयारी करीत आहेत. आपल्या आयुष्यावर लागलेला भीक मागण्याचा कलंक त्यांना धुवायचा आहे. मात्र तशी तयारी करून काही उपयोग नाही. तशी संधीही मिळायला हवी. सुदैवाने ती आहे. कष्टाची तयारी करून दैन्यातून सुटका करून घेण्याची संधी मिळत आहे. म्हणूनच भिकार्‍यांची संख्या घटत आहे. भिकार्‍यांच्या संख्येत कोणती राज्ये आघाडीवर आहेत याचे तपशीलही जनगणनेच्या अहवालात देण्यात आले आहेत. त्यानुसार आसाम या बाबत आघाडीवर आहे. आसामात भिकार्‍यांची संख्या आणि त्यांचे दर लाख लोकसंख्येेचे प्रमाण या दोन्ही गोष्टी मोठया आहेत. तिथे लाख लोकांमागे ८० भिकारी आहेत. ईशान्य भारतातल्या अन्य राज्यांत मात्र लाखामागे केवळ चार ते ११ भिकारी आहेत. तामिळनाडूत भिकारी फार कमी आहेत. जगातल्या गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा दावा करणार्‍या साम्यवाद्यांची ३५ वर्षे सत्ता असलेल्या बंगालातही भिकार्‍यांची संख्या जास्त असावी हा मोठाच दैवदुर्विलास आहे. उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही भिकार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर काही वाद निर्माण झाले आहेत. ही आकडेवारी मोजण्याची पद्धत चुकीची असल्याचा आरोप एका स्वयंसेवी संघटनेने केला असून देशात सरकार म्हणते त्यापेक्षा अधिक भिकारी असल्याचा दावा केला आहे.

दुसर्‍या बाजूला काही संघटनांनी भिकार्‍यांची संख्या यापेक्षा कमी असल्याचा दावा केला आहे. रस्त्यावर कसरतीचे प्रयोग करून पैसा मागणार्‍या डोंबार्‍यालाही या गणनेत भिकारी म्हटले आहे. काही लोक रेल्वेत हातातल्या बाजाच्या पेटीवर गाणे म्हणून दाखवून पैसा मागतात पण सरकारी गणनेत त्यांची गणना भिकार्‍यांत केली गेली आहे. या संघटनांच्या मते हे काही भिकारी नाहीत. ते कलाकार आहेत. असे हे परस्परविरोधी दावे असले तरीही सरकारी आकडा खरा वाटतो. मात्र आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, भीक मागणे ही एक प्रवृत्ती असते. काही लोकांना काम करण्याची क्षमता असूनही ते भीक मागतात पण लोकांनी कोणाही भिकार्‍याला भीक घालायचीच नाही असे ठरवले तर भिकार्‍यांची संख्या आपोआप कमी होईल.

Leave a Comment