भाज्या वाळवण्याचा उद्योग

vegetables
कृषी प्रक्रिया उद्योगाची चर्चा होत असताना त्यासाठी आवश्यक असणारे परवाने आणि यंत्रसामुग्री तसेच मार्केटिंग वगैरे शब्द वापरून शेतकर्‍यांना बिचकवले जाते. परंतु अशा कोणत्याही गोष्टींची अडचण न येता आपण काही सोप्या प्रक्रिया करू शकतो. त्यातली सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजे गोमूत्र बाटलीबंद करून विकणे. या विक्रीला कसलेही अवघड तंत्र लागत नाही, त्याला परवानगीही लागत नाही. सेंद्रीय शेती करणारे शेतकरी हेच या उत्पादनाचे मार्केट आहे. अशा लोकांना गोमूत्र पुरवणे हा सुद्धा एक सोपा, साधा उद्योग होऊ शकतो. त्यासाठी गोमूत्र पकडून ते वस्त्रगाळ केले पाहिजे. त्यातल्या त्यात आठ पदरी वस्त्राने ते गाळावे आणि ते स्वच्छ बाटलीमध्ये भरून सेंद्रीय शेतीचा अवलंब करणार्‍या शेतकर्‍यांना विकावे. हेच गोमूत्र औषधे तयार करणार्‍यांसाठी विकणार असू तर गोमूत्र भरत असलेली बाटली निर्जुंतूक करण्याची गरज असते. तशी ती केल्यास गोमूत्राला जास्तच भाव मिळतो. कारण गोमूत्रापासून ३२ प्रकारची औषधे तयार होतात. त्या औषधांना महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्य शासनांनी मान्यताही दिलेली आहे. अशी औषधे तयार करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना गोमूत्राचा सातत्याने पुरवठा करण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो.

गोमूत्रापासून काही शेतकरी सेंद्रीय औषधे किंवा संजीवके तयार करतात. त्यासाठी त्यामध्ये रुई, कडूनिंब किंवा तुळशीची पाने मिसळावी लागतात. त्याचबरोबर काही शेतकरी गोमूत्रात पाणी मिसळून ते पाणी शेतातल्या पिकांवर ङ्गवारत असतात. आणखी एक सोपा व्यवसाय आपल्यासाठी उपलब्ध आहे. तो म्हणजे भाज्या वाळवण्याचा. आपण दरवर्षी शेतातल्या हरभर्‍याची भाजी खुडत असतो आणि तिला छान वाळवून नंतर वर्षभर त्याची भाजी करून खात असतो. अशी खुडलेली ओली भाजी बाजारात भरपूर विक्रीला येते. मात्र वाळवलेली भाजी कोणी विकत नाही. जे लोक हंगामामध्ये ओली भाजी घेऊन वाळवत नाहीत, त्यांना नंतर वाळवलेली भाजी विकता येते. आपली ओली हरभर्‍याची भाजी बाजारात नेऊन विकण्यापेक्षा ती वाळवून विकावी. तिला चार पैसे जास्त मिळतात. कारण तिच्यावर आपण वाळवण्याची प्रक्रिया केलेली असते. ओली भाजी हंगामात विकायला येते तेव्हा भरपूर आवक झाल्यामुळे ती कमी भावाने विकली जाते. त्यापेक्षा चार दिवस थांबून, ती वाळवून विकली की तिला थोडा भाव जास्त मिळतो. तिचा भाव आपणच ठरवावा. त्यातल्या त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ती भरून विकली तर ती आकर्षक दिसते आणि विक्री करण्याची हातोटी असेल तर अशी भाजी घरोघर नेऊन सुद्धा विकता येते.

सध्या भाज्यांचे भाव ङ्गार वाढलेले आहेत. त्यामुळे लोकांना नेहमीच भाज्या खात येत नाहीत. कधी कधी हातात पैसे नसले की भाजीशिवाय जेवण करावे लागते. अशा लोकांना एकदाच खरेदी करून ठेवलेली अशी वाळवलेली भाजी ङ्गायदेशीर ठरते. ही गोष्ट पटवून देऊन आपण जर आपल्या भाजीची विक्री केली तर निश्‍चितपणे ही हरभर्‍याची वाळवलेली भाजी आपल्याला चांगले पैसे देऊन जाऊ शकते. अशी वाळवलेली भाजी धाबेवाल्यांना उपयुक्त ठरते. कारण धाबे गावापासून लांब असतात आणि अचानक जवळ असलेल्या भाज्या संपल्या की, एकदम भाजी उपलब्ध न झाल्यामुळे त्यांची पंचाईत होत असते. अशा वेळी कायम जवळ बाळगता येणारी भाजी म्हणून धाब्यांचे मालक हरभर्‍याची भाजी विकत घेऊ शकतात. भाज्या वाळवणे आणि त्या वाळवून विकणे हा कधी काळी चांगला उद्योग होऊ शकेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. परंतु सध्या काही भाज्या वाळवून विकल्या जायला लागल्या आहेत आणि येत्या काही दिवसात बर्‍याचशा भाज्या वाळवलेल्या स्वरुपातच विकल्या आणि विकत घेतल्या जातील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. हरभर्‍याची भाजी वाळवून वापरण्याचा प्रघात तर आपल्याकडे आहेच. परंतु आपण बाजारातल्या काही वस्तूंवर नजर टाकली तर भाजीपाल्यातले काही वाण वाळवलेल्या स्वरुपात बाजारात विक्रीला आलेले आपल्याला दिसतील.

सध्या वाळवलेली मेथीची भाजी बाजारात विकली जात आहे. वाळवलेल्या मेथीचे १०० ग्रॅम वजनाचे पाकीट १५ ते २० रुपयांना विकले जात आहे. त्याला आकर्षक पॅकिंग केलेले आहे आणि त्यावर कसुरी मेथी असे नाव आकर्षकपणे छापून त्याची विक्री केली जात आहे. काही धाब्यांवर ही कसुरी मेथी परोठ्यामध्ये घालायला वापरली जाते. या वाळवलेल्या पाल्याची भाजी केली तर ती ताज्या भाजीसारखीच होते. तिच्या चवीत काही ङ्गरक पडत नाही. कारण या पाल्यामधला पाण्याचा अंश ङ्गक्त काढलेला असतो. जोपर्यंत त्यात भरपूर पाणी असते तोपर्यंत तो पाला नासण्याची आणि कुजण्याची शक्यता असते. आपण त्यातले पाणी काढून टाकले की हा कोरडा पाला बरेच दिवस टिकवता येतो. तो वर्षभर सुद्धा चांगला राहतो. आपण चहा पितो, ती चहाची पावडर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो चहाच्या झाडाचा वाळवलेला पालाच आहे. त्यामुळे आपल्या शेतामध्ये उगवणार्‍या कोण कोणत्या पालेभाज्या वाळवून नंतर वापरता येतात यावर आपण आपल्या शेतातच प्रयोग केले पाहिजेत आणि या पालेभाज्या अशा वाळवून नंतर योग्य वेळी वापरण्याची सवय लोकांना लावली पाहिजे.

कोथिंबीर अशीच वाळवता येते. कोथिंबिरीच्या बाबतीत तर असा विलक्षण अनुभव येतो की, कधी कधी कोथिंबिरीची पेंडी बाजारात ग्राहकांना एक रुपयाला मिळते. म्हणजे प्रत्यक्षात त्या पेंडीचे शेतकर्‍याला २५ पैसे सुद्धा मिळत नाहीत आणि येईल त्या भावाला ती विकण्यावाचून काही पर्यायही नसतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे खूप नुकसान होते. मात्र काही वेळा कोथिंबिरीची पेंडी दहा-बारा रुपये देऊन सुद्धा मिळत नाही. चार काड्या घेतल्या तरी दोन रुपये द्यावे लागतात. काही वेळा कोथिंबिरीची पेंडी २५ रुपयाला विकली गेली आहे. अशा लहरी बाजारभावामध्ये आपली कोथिंबीर मातीमोलाने विकण्यापेक्षा तिचे भाव कोसळले की, कोथिंबीर वाळवून ठेवावी. योग्यवेळी ती उपयोगी पडू शकते. पालक ही अशीच एक पालेभाजी आहे. ती सुद्धा पावडरीच्या स्वरुपात विकली जात आहे. काही मोठ्या हॉटेलांमध्ये जेवणापूर्वी पालकाचे सूप (सार) प्यायला दिले जाते. बाजारातून ताजी पालकाची भाजी आणून तिच्यापासून सूप तयार करणे ङ्गार अवघड जाते. पण पालकाच्या पानांची पावडर तयार केली तर मात्र तिच्यापासून सूप तयार करणे सोपे जाते. ही पालकाची पावडर महागात विकली जात आहे. तेव्हा शेतकर्‍यांनी आपल्या पालकाच्या पेंड्या रुपया दीड रुपयाला विकून टाकण्यापेक्षा त्यांची पावडर तयार करण्याचे तंत्र अवगत करून घेतले तर एक नवा उद्योग आपल्याला मिळू शकतो.

अशाच तर्‍हेने कडीपाल्याची सुद्धा पावडर तयार करता येते. कडीपाला हा पित्तशामक असतो. अमेरिकेतल्या काही शास्त्रज्ञांनी तर तो कर्करोग प्रतिबंधक असल्याचेही दावे केले आहेत. आपल्याकडे कडीपाला खूप वापरला जातो, परंतु तो खाल्ला जात नाही. आपण भाजीत किंवा आमटीमध्ये कडीपाला टाकतो. पण भाजी, आमटी खाताना ती पाने बाजूला काढतो. एखाद्या पंगतीवर नजर टाकली तर अशी काढलेली पाने प्रत्येकाच्या ताटाच्या भोवती पडलेली दिसतात. आपण या पानांचा केवळ स्वाद घेतो. ती आपल्या पोटात जात नाहीत आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा आपल्याला काही ङ्गायदा होत नाही. तेव्हा हा कडीपाला व्यवस्थित वाळवला आणि त्याची पावडर करून खाल्ली तर ती स्वाद आणि औषधी गुणधर्म या दोन्ही दृष्टींनी उपयुक्त ठरते. ही गोष्ट लोकांना पटवून देऊन आपण कडीपाल्याच्या पावडरचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याला मिक्सरशिवाय कसलीही यंत्रसामुग्री लागत नाही.

2 thoughts on “भाज्या वाळवण्याचा उद्योग”

  1. पोपट पांढरे मो.न.९५५२८८५६५६

    उद्योग छान आहे

  2. मुंबई ठाणे भागात कोणी असे भाज्या वाळविण्याचे काम करत आहे का. कळवावे.

Leave a Comment