पुराचा धोका ; यंदा अलमट्टी धरणावर महाराष्ट्राची ‘करडी नजर’

almatti
कोल्हापूर – कर्नाटक शासनाने अलमट्टीमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केल्यास यंदा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यास महापुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकातील काही दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने कर्नाटक शासन पूर्णक्षमतेनेदेखील पाणीसाठा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून पुराचा धोका उदभवू नये यासाठी अलमट्टी धरणातील दैनंदिन पाणीसाठा आणि विसर्गावर विशेष नजर ठेवणार आहेत.

यंदा कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे बांधकाम केंद्र शासनाच्या मंजुरीप्रमाणे पूर्ण झाले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यामुळे धरणाची उंची ५१९.६५ मीटरवरून ५२४ मीटर झाली आहे. त्यामुळे यंदा अलमट्टी धरणामधील पाणीसाठय़ात दरवर्षीपेक्षा वाढ होण्याची शक्यता आहे. या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यास पुन्हा पुराचा धोका निर्माण होणार आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ४.३५ मीटरने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ५२४ मीटर अलमट्टी धरणाची उंची झाली असून, वाढविलेल्या उंचीनुसार पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याचे कर्नाटक शासनाचे धोरण आहे; पण पूर्ण क्षमतेनुसार पाणीसाठा करण्यासाठी अलमट्टी धरणक्षेत्रातील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. यासाठी कर्नाटक सरकारला बराच कालावधी लागणार आहे. यावर्षी ५१८ मीटर उंचीपर्यंत पाणीसाठा करण्याची महाराष्ट्र सरकारकडून मागणी केली असताना ५१९.६0 मीटर उंचीपर्यंत पाणीसाठा केला जाणार आहे. त्यामुळे अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागामध्ये समन्वय ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना २00५ च्या पावसाळ्यात महापुराचा तडाखा देणार्‍या नऊ कारणांपैकी अलमट्टी धरण एक कारण असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे. हेच कारण सयुक्तिक धरून पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ, जयसिंगपूर, हातकणंगले तालुक्याचा भाग हा अलमट्टीचे पाणलोट क्षेत्र बनल्याचाच निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे एका अर्थाने या दोन जिल्ह्यांत पूर येणार की नाही हे अलमट्टी धरणच ठरवणार असल्याचे चित्र आहे.शासनाच्या आदेशानुसार आणि आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून पाटबंधारे विभाग १ जूनपासूनच अलमट्टी धरणातील दैनंदिन पाणीसाठा, धरणातून पाणी सोडून देण्याची प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करून आहे. गेल्या आठ वर्षांत आंतरराष्ट्रीय निकषानुसार पाणीसाठय़ाचे योग्य नियोजन केल्यानेच दोन्ही जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला नाही. जुलै २00५ मध्ये आलेल्या महापुराच्या तडाख्यात दोन्ही जिल्ह्यांना मोठी हानी पोहोचली. पूर ओसरल्यावर सुरू झालेल्या अभ्यासात अलमट्टी धरणाची उंची आणि साठवले जाणारे पाणी यांचा एकत्रित परिणाम म्हणून पूर आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, सामाजिक संघटनांनी काढलेला निष्कर्ष सुरुवातीला मान्य केला गेला नाही. मात्र, नंतरच्या काळात अलमट्टी धरणामुळेच पूर आला होता हे मान्य करण्यात आले. राज्य शासन, कॅगचा अहवाल व पर्यावरणप्रेमींच्या अभ्यासातून अलमट्टी धरणच पुराला कारणीभूत ठरते, असे गृहीतक मांडण्यात आले. मात्र, ते कर्नाटक व केंद्र शासन या दोघांनाही मान्य नाही अशी स्थिती आहे.