दाऊदच्या विरोधात फास आवळणार का?

modi2
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याचे वेध लागल्यापासून त्यांनी दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून पकडून आणणार असल्याची घोषणा करायला सुरूवात केली आहे. त्यांना सत्तेवर येऊन आता महिना उलटला. पण अजून तरी त्या दिशेने त्यांची काही पावले पडली असल्याचे दिसलेले नाही. मात्र भारताचे गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी दाऊद इब्राहिमला ‘जिंदा या मुर्दा’ पकडण्याची शक्यता आजमावून पहात आहेत. त्याला तसे पकडायचे असेल तर परदेशी यंत्रणा आणि सरकारे यांची मदत घ्यावी लागते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर करावयाच्या अशा प्रयत्नांसाठी एक वेगळ्याच प्रकारची इच्छाशक्ती बाळगणारे नेते असावे लागतात. नरेंद्र मोदी यांनी इराकमधील भारतीयांना सोडवून आणताना अशा इच्छाशक्तीचा आणि अशा कामासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याचा प्रत्यय आणून दिला आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिचा मृत्यू होताच पुन्हा एकदा दाऊदला पकडून आणण्याच्या प्रयत्नांची चर्चा सुरू झाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दाऊद इब्राहिमला जेरबंद करून आणण्याची इच्छाशक्ती आहे की नाही यावर त्यांचे विरोधक प्रश्‍नचिन्ह निर्माण करतील. परंतु खुद्द दाऊदला मात्र मोदी आपल्याला पकडू शकतात अशी खात्री वाटते. म्हणून मोदींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी होताच दाऊद आणि त्याच्या सहकार्‍यांनी कराचीतला मुक्काम हलवून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवरील डोंगराळ प्रदेशात जाऊन वास्तव्य केले आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पकडताना ज्या प्रकारची कारवाई केली तशीच कारवाई नरेंद्र मोदींच्या सरकारने आपल्या विरुध्द केली तर आधी सावधगिरी बाळगलेली बरी म्हणून दाऊदने आपला मुक्काम हलवला आहे. नरेंद्र मोदी यांच्या विश्‍वासातले काही गुप्तचर अधिकारी काही योजना आखत आहेत. त्यांनासुध्दा ही गोष्ट कळते. शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूंना नामोहरम करण्यासाठी प्रत्येकवेळी नवी युक्ती वापरली होती. कारण एकदा एक युक्ती वापरली की शत्रू तिच्याबाबतीत सावध होत असतो. तेव्हा भारताचे गुप्तचर अधिकारी लादेनसारखी कारवाई करून दाऊदला पकडण्याच्या विचारात नाहीत. दाऊद इब्राहिमच्या जीवनातले आणि त्याच्या गँगमधले काही कच्चे दुवे हेरून एक वेगळ्या प्रकारचा डाव रचण्याचा प्रयत्न गुप्तचर यंत्रणा आखत आहेत.
गुप्तचर यंत्रणांची नेमकी योजना काय असेल हे आपल्याला कळणार नाही. परंतु पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा त्याच्या कोणत्या कच्च्या दुव्यावर लक्ष ठेवून आहेत याची काही माहिती उपलब्ध झाली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाऊद इब्राहिमला २०११ साली हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले आहेत. पोलिसांच्या अंदाजानुसार त्याचे काळ्या पैशाचे साम्राज्य साधारणतः ८० ते ९० हजार कोटी रुपयांचे आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आणि सातत्याने आजारी असल्याने दाऊद इब्राहिम आपला वारस कोण याचा विचार करायला लागला आहे आणि त्याच्या गँगमध्ये त्यावरून काही मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. दाऊदचा वारस म्हणून त्याचा कोणताही भाऊ पुढे येत नाही. त्याचा एक भाऊ अनिस हा दाऊदसोबत कराचीत राहतो. दुसरा एक भाऊ इक्बाल हा भारतामध्येच आहे. पण दाऊदच्या मुंबईतल्या साम्राज्यावर इक्बालचे नियंत्रण नाही तर दाऊदचा नजिकचा विश्‍वासू सहकारी छोटा शकील याचे नियंत्रण आहे. छोटा शकील हा दाऊदचा अगदी उजवा हात आहे आणि तोच दाऊदच्या नंतर हे साम्राज्य सांभाळेल असे वाटावे इतपत तो आता नंबर दोन म्हणून कार्यरत झाला आहे. खरे तर दाऊदचा जवळचा सहकारी हे स्थान इक्बाल िमर्ची याने मिळवले होते. त्याला तर दाऊदचा मेंदू म्हटले जात होते. परंतु तो २०१३ च्या ऑगस्टमध्ये लंडनमध्ये हृदयविकाराने मरण पावला. तेव्हापासून छोटा शकीलचे महत्त्व वाढले आहे. त्याच्या वाढत्या वर्चस्वामुळे दाऊद इब्राहिमचे अन्य भाऊ कितपत अस्वस्थ झाले आहेत यावर गुप्तचर यंत्रणांची नजर आहे.
दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन उर्फ राजन निकाळजे यांच्यातील दुश्मनी सर्वांना माहीत आहे. १९९३ पूर्वी छोटा राजन आणि त्याचे सहकारी दाऊदच्या गँगमध्येच होते. परंतु ९३ च्या बॉम्बस्फोटापासून या गँगमध्ये हिंदू विरुध्द मुस्लीम फूट पडली. छोटा राजनने एकदा दाऊद इब्राहिमला संपवण्याचा प्रयत्न केला होता. डी. के. राव आणि फरीद तनाशा या दोघा शार्प शूटर्सना दाऊदचा खून करण्यासाठी कराचीला पाठवले होेते. परंतु दाऊद इब्राहिमला या कटाचा सुगावा कसा लागला हे माहीत नाही पण तो कराचीमध्ये अपेक्षित असलेल्या ठिकाणी आलाच नाही आणि बचावला. छोटा राजन आपल्या जीवावर उठला आहे कळल्यावर दाऊदने २००१ साली बँकॉंकमध्ये त्याच्यावर मारेकरी घातले. पण छोटा राजन थोडक्यात बचावला. त्यानंतर छोटा राजनने डी गँगचे चार-पाच लोक यमसदनाला पाठवले. त्यामध्ये सुनील सावंत, पिलू खान यांचा समावेश होता. छोटा राजनची ही दाऊद विरोधी भूमिका विचारात घेऊन भारताचे गुप्तचर अधिकारी त्याचाच वापर करून दाऊदला संपवण्याचा डाव आखू शकतात.
भारताच्या गुप्तचर यंत्रणेने १९९३ साली म्हणजे मुंबई बॉम्बस्फोट झाल्याबरोबर पाच झुंजार अधिकारी कराचीत पाठवून दाऊदचा काटा काढण्याचे ठरवले होते. परंत तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे ही योजना फसली. २००५ साली अशी एक संधी पुन्हा आली होती. गुप्तचर संघटनेचे माजी संचालक अजितकुमार दोवाल यांनी पुन्हा एकदा व्हिकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा या दोघांवर ही जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी दाऊदच्या मुलीचे लग्न होते आणि तो या लग्नाच्या रिसेप्शनला नक्कीच येणार म्हणून तिथेच त्याला पकडणे किंवा खलास करणे अशी जबाबदारी या दोघांवर सोपवली होती. मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणातील गोंधळामुळे ही योजना फसली. व्हिकी मल्होत्रा हा फरार गुंडच आहे आणि तो काही निमित्ताने दुबईला जाण्यासाठी मुंबईत येत आहे हे मुंबई पोलिसांना कळले आणि त्यांनी त्याला मुंबईत अटक केली. तो गुंड असला तरी एका चांगल्या कामाला चाललेला आहे हे मुंबईच्या पोलिसांना कळले नाही.
अजितकुमार दोवाल यांची ही योजना पोलिसांच्या गांेंधळामुळे फसली असे वरकरणी दिसत असले तरी काही गुप्तचरांच्या मते ती योजना दाऊदनेच फसवली होती. दाऊद इब्राहिमला आपल्यावर मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हल्ला होऊ शकतो असे वाटत होतेच आणि त्याची माहिती काढण्यासाठी दाऊदची प्रति गुप्तचर यंत्रणा कामाला लागली होती. छोटा राजनची दोन माणसे आपल्या मागावर दुबईला निघाली आहेत आणि ती सरकारच्याच मदतीने येत आहेत हेही त्याला कळले होते. मुंबईच्या पोलिसांमध्ये दाऊदची माणसे आहेत. त्यांना दाऊदने हे कळवले आणि त्यांनी व्हिकी मल्होत्राला पकडून ए. के. दोवाल यांचा कट उधळून लावला.
दाऊद इब्राहिमला मारणे किंवा पकडणे सोपे नाही. दाऊद पकडला किंवा मारला जाणे हे पाकिस्तानच्या आयएसआय संस्थेला नको आहे. तसा प्रसंग उद्भवलाच आणि दाऊद मारला जाणार किंवा पकडला जाणार अशी शक्यता दिसायला लागली तर आधी आयएसआयचे अधिकारीच त्याला मारून टाकतील. कारण दाऊद पकडला गेल्यास त्याच्याकडून जी रहस्ये कळणार आहेत ती पाकिस्तानला परवडणारी नाहीत. आयएसआयचे सुरक्षा कवच तर त्याला आहेच पण त्याच्या स्वतःची एक सुरक्षा व्यवस्था नेमलेली आहे. त्याने सुरक्षा व्यवस्थेच्या परिघावर बलुचिस्तानातले काही कट्टर संरक्षक नेमले आहेत. त्याची सुरक्षा व्यवस्था अनेक स्तरांची आहे. या सगळ्यातून त्याला पकडायचे असेल किंवा नेस्तनाबूत करायचे असेल तर भारताच्या गुप्तचर यंत्रणांना फार चातुर्याने काम करावे लागणार आहे. याची जाणीव नरेंद्र मोदी यांनाही आहे आणि त्यांनी तशी तयारीसुध्दा केली आहे.
– अरविंद जोशी

Leave a Comment