ट्यूशन क्लास – उत्तम बिनभांडवली उद्योग

tutuions
अनेक सुशिक्षित तरुण पदव्या मिळवून नोकरीसाठी भटकत असतात. परंतु आपण नोकरीसाठी लोकांच्या समोर हात पसरण्यापेक्षा आपला स्वत:चा रोजगार स्वत:च तयार का करू नये, असे प्रश्‍न त्याला पडत नाही. शिक्षणाने माणूस शहाणा होतो असे म्हणतात, पण ते जर खरे असेल तर शिक्षण संपविल्यानंतर तरुण माणूस असा उपजीविकेच्या साधनाच्या बाबतीत परावलंबी का व्हावा? शिक्षण घेऊन त्याच्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद येत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय? खरे म्हणजे अशा तरुण मुलांनी ट्यूशन क्लासेस काढणे हा व्यवसाय अंगीकारला पाहिजे. या धंद्याला एक पैसा सुद्धा भांडवल लागत नाही. स्वत:ची जागा असली, मग ती भाड्याची का असेना त्या जागेच्या एका खोलीमध्ये आपला क्लास सुरू करता येतो. पदवीधर मुलांना सातवी-आठवीच्या मुलांना शिकवणे काही अवघड नाही. अभ्यास चांगलाच असेल तर पदवीधर असलेला विद्यार्थी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले शिकवू शकतो. काही मुलांकडे स्वत:ची जागा नसेल तरी अडचण येणार नाही. कारण काही श्रीमंत लोक शिक्षकांनाच आपल्या घरी बोलावून शिकवायला लावतात. अशा घरी जाऊन घेतलेल्या शिकवणीची फी सुद्धा चांगली भरघोस असते.

सध्या खाजगी शिकवणी लावण्याची प्रवृत्ती वाढली आहे. किंबहुना बहुतेक विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी लावलेलीच असते. पूर्वीच्या काळी शिकवणी ही चैन वाटत होती. केवळ श्रीमंतांचीच मुले शिकवण्या लावत असत. साधारणपणे अवघड जाणार्‍या विषयांना शिकवणी लावण्याची पद्धत होती. आता शिकवणीची पद्धत एवढी वाढली आहे की, पूर्वीच्या काळी कोणी शिकवणी न लावता शिकत होते असे म्हटले तर तरुण पिढीला आश्‍चर्य वाटेल. सध्या शिकवणी शाळेइतकीच महत्वाची झाली आहे. पूर्वी गणित आणि इंग्रजी या विषयांची शिकवणी लावलेली असे. कारण इंग्रजी मुळातच अवघड वाटते आणि गणिताला सरावाची गरज असते. पण आता मराठी, हिंदी, भूगोल, विज्ञान याही विषयांना अगदी चौथीपासून शिकवणी लावलेली असते. पूर्वी शाळेच्या मुलांना शिकवण्या लावल्या जात, पण आता कॉलेजच्या मुुलांना सुद्धा शिकवण्या लावल्या जातात. त्यामुळे शिकवणी वर्ग हा व्यवसाय प्रचंड वाढलेला आहे. त्याचा फायदा घेऊन पदवीधर झालेल्या मुलांनी नोकर्‍या मागत फिरण्यापेक्षा शिकवणी वर्ग सुरू करून नोकरीपेक्षा अधिक कमाई करण्याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी भांडवल लागत नसले तरी बुद्धी आणि शिकवण्याची लकब या गोष्टी आवश्यक आहेत.

शिकवणी वर्गाच्या माध्यमातून मोठी उलाढाल होण्याचे कारण म्हणजे खाजगी शिकवण्यावर होत असलेला मोठा खर्च. टाईम्स् ऑफ इंडियामध्ये गेल्या आठवड्यात कुटुंबाच्या खर्चाचा एक आढावा आला आहे. त्या आढाव्यात भारतातली कुटुंबे शिक्षणावर किती खर्च करतात याचे तपशील छापून आले आहे. त्यात खाजगी शिकवणी वर्गावर गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागातल्या कुटुंबांचा दरमहाचा खर्च चौपटीने तर शहरातल्या कुटुंबाचा खर्च तिपटीने वाढला असल्याचे म्हटले आहे. या वाढीमध्ये एक छान उद्योग लपलेला आहे. याची जाणीव सुशिक्षित मुलांना झाली पाहिजे. शिकवणी वर्ग सुरू करताना तो अगदी प्राथमिक अवस्थेत सुरू करावा. फार देखावा करू नये, जाहिरात करू नये. वैयक्तिक संपर्कातून मुले मिळवावीत. तशी ती मिळतात आणि जाहिरात करून मुले मिळवायचीच असती तर खर्चिक जाहिरात न करता दैनिकांच्या छोट्या जाहिरातींमध्ये जाहिरात द्यावी. तिला फार कमी खर्च येतो. या धंद्याचे वैशिष्ट्य असे की, एखादा शिक्षक छान शिकवतो हे कर्णोपकर्णी लोकांना कळत गेले की, फार मोठी जाहिरात करायची गरजच पडत नाही. आपोआपच मुले येत राहतात आणि व्यवसाय वाढत राहतो.

पुढे पुढे तर क्लासेस किंवा शिकवणी वर्ग याचे असे गुडविल तयार होते की, मुळात तो वर्ग सुरू करणारा शिक्षक स्वत: शिकवत नसला तरी मुलांचा ओढा त्याच क्लासकडे असतो. पुण्यात, मुंबईत आणि महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये ट्यूशन क्लासेस हा करोडो रुपयांची उलाढाल करणारा व्यवसाय ठरला आहे. तो व्यवसाय मुळात कुटुंबात व्यवसायाची परंपरा नसलेल्या मध्यम वर्गीय मराठी माणसांनीच वाढवलेला आहे. राजस्थानातील कोटा येथे तर या व्यवसायाने फार मोठे यश मिळवले आहे. बारावीनंतर द्यावयाच्या प्रवेश परीक्षांची ट्यूशन देण्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे आणि या क्लासेससाठी देशभरातले विद्यार्थी तिथे येत असतात. क्लासेसच्या निमित्ताने बोर्डिंग आणि खानावळी यांचेही व्यवसाय या गावामध्ये वाढले आहेत. महाराष्ट्रात लातूर पॅटर्न फार प्रसिद्ध आहे. मात्र लातूर पॅटर्न प्रमाणे शिक्षण देणारे गाव म्हणून अहमदपूरची ख्याती आहे. या गावात सध्या क्लासेस आणि त्यासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या रहायच्या, जेवण्याच्या आणि अभ्यास करून घेण्याच्या सोयीच्या निमित्ताने कित्येक कुटुंबांचे व्यवसाय निर्माण झाले आहे. ट्यूशन क्लासेसच्या संचालकांना तर लाखोंची कमाई होत आहे. सुशिक्षित तरुणांनी या क्षेत्रात उतरले पाहिजे.

Leave a Comment