कथा अकलेच्या कांद्याची

onion
प्रा.सतीश पिंपळगांवकर यांनी शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी यांच्यासंबंधात एक उपक्रम केला होता. तो त्यांनी सांगितला. हा प्रयोग शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असल्यामुळे तो येथे मुद्दाम देत आहे. प्रा. पिंपळगावकर हे मराठवाड्यातले कळंबचे राहणारे. आता पुण्यात स्थायिक झाले आहेत. पूर्वी ते नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड गावी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करीत होते. शेतकर्‍यांची अवस्था हा त्यांच्या कायमचा चिंतनाचा विषय आहे. चांदवड मुक्कामी त्यांचा शेतकर्‍यांच्या अनेक मुलांशी जवळून संबंध आला. कांदा हे या भागातले मुख्य पीक आहे. हे पीक डोळ्यांना पाणी आणणारे. कांदा चिरताना गृहिणींच्या डोळ्यांना पाणी येते. त्याचे भाव वाढले की, ग्राहकांच्या डोळ्यांना पाणी येते. मग, ‘कांदा महागला, कांदा महागला’ अशी हाकाटी सुरू होते मग सरकारच्या डोळ्याला केवळ पाणीच येते असे नाही तर सरकारचे डोळे पांढरे होतात. मग कांदा स्वस्त केला जातो. या सार्‍या अर्थकारणात आणि राजकारणात हाच कांदा पिकविणार्‍या शेतकर्‍यांच्या डोळ्यांना मात्र कायम पाण्याच्या धारा लावत असतो. अशा कांदा उत्पादक शेतकर्‍यांची निराश झालेली मुलं प्रा. पिंपळगावकर यांच्याशी बोलत असत. त्यांच्या बोलण्यात भवितव्याविषयीची अनिश्‍चितता प्रतिबिंबित होई.

प्रा. पिंपळगावकर यांनी या मुलांना केवळ कांदा पिकवून न थांबता, ‘‘कांद्यासोबत प्रवास’’ करण्याचा सल्ला दिला. म्हणजे कांदा विक्रीसाठी पिंपळगाव बसवंतला गेला की, त्या कांद्याच्या ट्रकमध्ये बसून पिंपळगावला जा. कांदा पिकवून तो ग्राहकाच्या पदरात पडेपर्यंत आणि पदरात पडून पोटात जाईपर्यंत त्याचा प्रवास कसा कसा होतो याचे निरीक्षण करा. या प्रवासात किती उद्योग उभे राहतात, किती जणांना किती रोजगार मिळत असतो याचा अभ्यास करा. कांदा पिकवणे आणि विकणे यावर भागत नाही. त्यात नेहमी अनिश्‍चितता असते तर मग आपल्या कांद्याने तयार केलेल्या रोजगार संधीपैकी कोणती संधी आपल्याला मिळवता येईल याचा विचार करा, असा सल्ला सरांनी विद्यार्थ्यांना दिला. काही विद्यार्थ्यांनी तसा प्रवास खरोखरच केला आणि त्यातल्या काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, शेतात भरपूर राबूनही आपल्याला जेवढं काही मिळतं त्यापेक्षा जास्त उत्पन्न ट्रकचा ड्रायव्हर मिळवतो. तेव्हा आपण ड्रायव्हर झालेलं काय वाईट ? मग काही मुलांनी ते काम मिळवलं.

काहींनी स्वत:चे ट्रक, काहींनी टेम्पो घेतले. काही विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलं की, आपला कांदा विकण्यात दलाली करणारा आडत्या, कसलंही भांडवल न गुंतवता केवळ बोली बोलून भरपूर पैसा कमावतो. केवळ जागेची व्यवस्था केली की झालं. याचा विचार करून काही विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आडती सुरू केल्या. भाजीपाल्याच्या व्यवसायात शेतकर्‍यांपेक्षा दलालांचे उत्पन्न जास्त असते. कांद्याबरोबर प्रवास करताना काही विद्यार्थी आपला तीन रुपये किलो भावाने विकला गेलेला कांदा पुढे व्यापारी ८ ते १० रुपये किलो भावानं किरकोळ ग्राहकांच्या माथी कसा मारतात हेही बघायला लागले. त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी हा व्यवसाय निवडला. पुढे हॉटेलात हा कांदा कसा महाग झालेला असतो, कांद्याची भजी केवढ्याला असतात याचंही काहींनी निरीक्षण केलं. त्यातूनही काहींनी रोजगार मिळवला. हा कांदा पुढं मसाल्यात जातो तेव्हा त्याला आलेलं मोल आपल्याला मिळालेल्या मोलापेक्षा किती जास्त असतं याचं ज्ञान झालं तेव्हा तर डोक्यात चांगलाच प्रकाश पडला.

आजवर कथा अडाणी शेतकर्‍याची होती ती आता अकलेच्या कांद्याची झाली. कांदे कापून त्याचे काप करावेत. ते वाळवावेत. अगदी साध्या उन्हात वाळवावेत. हे वाळवलेले कांद्याचे काप तळून चिवड्यात आणि मसाल्यात वापरले जातात. त्यांना चांगला भाव येतो. या उद्योगासाठी कसलेही अवघड तंत्र नाही की यंत्र नाही. मार्केटही अवघड नाही. कांद्यावर प्रक्रिया करणारा मोठा उद्योगच काढायचा असेल तर कांद्याची पावडर करण्याचा उद्योग उभारता येतो. कांद्याची पावडर परदेशी निर्यातही केली जाते. कांद्याबाबत अधिक माहितीसाठी राष्ट्रीय कांदा, लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर, जि. पुणे यांच्याशी संपर्क साधता येईल.

Leave a Comment