बारामती – मुख्यमंत्री कराडमध्ये राहतात, तर पंतप्रधान दिल्लीत राहतात ,मग कोणतेही आंदोलन असो, नेहमी बारामतीच टार्गेट का ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
आंदोलनासाठी बारामतीच कशासाठी ? अजित पवारांचा सवाल
धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी दि. १५ ते २३ जुलै रोजी पंढरपूर-बारामती पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा धागा पकडत बारामती येथील शासकीय कार्यालयांच्या उदघाटन समारंभाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते . ते म्हणाले, मुख्यमंत्री कराडमध्ये राहतात, पंतप्रधान दिल्लीत असतात, तरीदेखील ऊसदराचे आंदोलन बारामतीतच करण्यात आले. ऊस दरासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माळेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळेच त्यांनी अन्न खात्याचा राजीनामा दिला. वास्तविक पाहता शेतकर्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय शरद पवार यांनी घेतले आहेत. धनगर समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जमातीत करण्यासाठी शरद पवार यांच्या कार्यकाळातच निर्णय घेण्यात आला. आता धनगर व लिंगायत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे.आता कोणीही राजकारण करू नये. अहिल्यादेवी होळकर व बहिणाबाई चौधरी यांचे नाव दोन विद्यापिठांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.