नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी सहकार्य हवे ;अजित पवार

ajit
बारामती – अपुऱ्या पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी शासनास सहकार्य करण्याची भूमिका घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

बारामती येथील विविध शासकीय इमारतींचे तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उदघाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

जुलै महिन्यापर्यंत राज्यात अपेक्षेपेक्षा पाऊस खूपच कमी झाला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील सर्व पाणीसाठे हे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करण्यात आले आहेत. बारामती शहराला पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. आपत्ती ही राष्ट्रीय संकट असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन जलसंवर्धनाच्या विविध योजना राबवित आहेत. त्यासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद टाळून शासनाला मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे.

विकासाचे मॉडेल म्हणून देशात बारामतीची ओळख असल्याचे स्पष्ट करुन अजित पवार म्हणाले, नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागाच्या कार्यालयांच्या इमारती आकर्षक व भव्य स्वरुपात बांधल्या गेल्या आहेत. यामुळे बारामती शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणसांना सौजन्याची वागणूक देऊन त्यांची कामे मार्गी लावावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे काम करुन जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे. असेही ते म्हणाले.

Leave a Comment