निराशेच्या गर्तेत पुणेकर दात्यांमुळे जीवनाला मिळाली दिशा !

Disha
पुणे – खेडेगावात राहणारे आम्ही… गावाला दुष्काळ , घरची आर्थिक स्थिती बेताची … काबाडकष्ट करणारे आई -वडील ;पण आमच्या शिक्षणासाठी ते हतबल. मनात शिक्षण घ्यायची इच्छा मात्र कसे होईल या निराशेच्या गर्तेत अडकलेलो असताना आम्हाला ‘दिशा’ मिळाली, दानशूर दात्यांमुळे शिक्षणाचा मार्ग सुकर झाला , दिशा परिवारामुळे जीवनाला यशस्वी कलाटणी मिळाली आहे. आणि दात्यांमुळेच आज यशस्वी झालो आहोत. भविष्यात आम्हीही अनेक गरीब -गरजू विद्यार्थ्यांसाठी दिशा परिवाराची चळवळ व्यापक बनवू असा निर्धार अनेक विद्यार्थ्यांनी येथे व्यक्त केला.

दिशा परिवारातर्फे पुण्यातील दानशूर दात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारवाडा येथून १९ जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी रविवारी कृतज्ञता रैली काढली. त्यावेळी वैद्यकीय ,अभियांत्रिकी ,आयटी या क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत असणारे ;पण हालाखीच्या परिस्थितीत शिकण्याची इच्छा त्यासाठी दिशा परिवाराचा मिळालेला आधार आणि शिक्षणाचा आर्थिक भार उचलणारे दानशूर दात्यांबद्दल अनेक माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि अर्थतज्ञ अजित अभ्यंकर ,दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अशोक गोडसे ,महेश सूर्यवंशी ,सुरेश देशमुख ,जेष्ट पत्रकार संपादक मल्हार अरणकल्ले ,बी. एन.स्वामी ,महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कर्णे गुरुजी ,कृषीतज्ञ डॉ बुधाजीराव मुळीक यांच्यासह दिशा परिवाराचे राजाभाऊ चव्हाण ,भगवान धुमाळ ,धनराज राठी आदी उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ चव्हाण यांनी दिशा परिवाराच्या कार्याची माहिती देताना गरजू -गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दात्यांनी केलेल्या मदतीमुळे आज अनेक विद्यार्थी घडले आहेत. यंदाच्या वर्षासाठी पन्नास लाख रुपये गरजू विद्यार्थ्यांवर खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय दात्यांचे आणि विद्यार्थ्यांचे नाते हे काही परीक्षेच्या शुल्कापुरते सीमित न राहता कुणाला मुलगी ,नात मिळाली आहे.याकडेही त्यांनी लक्ष वेधले.यावेळी अजित अभ्यंकर म्हणाले, समाजामध्ये स्वार्थ वाढत असताना आपले समाजाप्रती काही तरी योगदान असावे या हेतूने सुरु असलेल्या दिशा परिवाराचे कार्य प्रेरणादायी आहे. मल्हार अरणकल्ले यांनी दिशा परिवाराच्या कार्यामुळे भारावून गेलो आहे. दोन हाताचे अंतर कमी करण्याचे ब्रीदवाक्य बरेच काही सांगून जाते,गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे दिशा परिवाराचे कार्य उल्लेखनीय आहे असे ते म्हणाले. शनिवारवाडा येथून आम्ही पुणेकर दात्यांचे ऋणी असे फलक हातात घेवून विद्यार्थ्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती ,लक्ष्मी रस्त्याने रैली काढली त्याचा समारोप अण्णाभाऊ साठे प्रशाला येथे झाला.

… माझ्या लग्नाचेही टेन्शन !
घरची आर्थिक परीस्थिती नसतानाही शिक्षण घेण्याची जबरदस्त इच्छा आणि त्यासाठी दिशा परिवाराच्या रूपाने दात्यांची मदत मिळाली. आमच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी काळजी दात्यांनी घेतली , जन्मभर त्यांचे ऋण राहणार आहे,पण आम्हाला लाभलेल्या दात्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आम्हाला सामावून घेतले आहे इतकेच काय मला नातीसारखे जपणाऱ्या आबांना माझ्या लग्नाचेही टेन्शन आहे,असे हे नाते दृढ झाले आहे असे मनोगत माजी विद्यार्थीनीने व्यक्त केले.