तिसरी वनडे बरोबर द. आफ्रिकेने मालिका जिंकली

south-africa
हंबानटोटा- दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धची तिसरी आणि अंतिम लढत ८२ धावांनी जिंकत वनडे मालिका २-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा लंकेतील हा पहिलाच मालिका विजय आहे. फलंदाजांनी वर्चस्व राखलेल्या लढतीत शनिवारी तब्बल ५९६ धावा कुटल्या गेल्या. दोन शतकांसह एका अर्धशतकांची नोंद झाली.
पाहुण्यांच्या ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांच्या फलंदाजांनी निराशा केल्या. केवळ कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला (५८) अर्धशतकी मजल मारता आली. अन्य चार फलंदाजांनी केलेल्या ३०हून अधिक धावा आणि २८ अवांतर धावांनंतर श्रीलंकेचा डाव ४४.३ षटकांत २५७ धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेतर्फे रायन मॅक्लॅरेन (३ विकेट) सर्वात यशस्वी ठरला. त्याला मार्नी मार्केल आणि जेपी दुमिनीची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५ बाद ३३९ अशी मोठी धावसंख्या उभारली. त्यात सलामीवीर, यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक (१२७ चेंडूंत १२८ धावा) आणि कर्णधार एबी डेविलियर्सच्या (७१ चेंडूंत १०८ धावा) फटकेबाज शतकांचा मोठा वाटा आहे.

कॉकने त्याच्या पाचवे वनडे शतक झळकावताना १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. डेविलियर्सने वनडे शतकांची संख्या १७वर नेताना ११ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. डेविलियर्सला सामनावीर तसेच सलामीवीर हशिम अमलला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

Leave a Comment