अनिर्णितावस्थेकडे पहिली कसोटी

india
नॉटिंगहॅम- इंग्लंडने पहिल्या डावात घेतलेल्या ३९ धावांच्या आघाडीनंतर भारताने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तीन बाद १६७ धावा केल्या आहेत. दिवस अखेर भारताकडे १२८ धावांची आघाडी झाली आहे. मैदानावर विराट कोहली(आठ) आणि अजिंक्य रहाणे (१८) खेळत आहे. आज कसोटीचा पाचवा आणि अंतिम दिवस असल्याने पहिली कसोटी अनिर्णितावस्थेकडे झुकली आहे.

भारताच्या दुस-या डावात सुरुवातीलाच शिखर धवन २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुस-या विकेटसाठी ९१ धावांची भागादीरी केली. ही जोडी चौथ्या दिवशी भारताला मोठ्या आघाडीकडे घेऊन जाईल असे वाटत होते. मात्र पहिल्या डावातील शतकवीर मुरली विजय ५२ धावांवर बाद झाला. तर त्या पाठोपाठ पुजाराही ५५ धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था तीन बाद १४० झाली. खेळ संपण्यासाठी अद्याप आठ षटके बाकी असल्यामुळे भारतीय संघावर तणाव वाढला होता. पण मैदानात असलेल्या कोहली आणि रहाणे यांनी अखेरपर्यंत विकेट पडू दिली नाही.

त्याआधी मधल्या फळीतील ज्यो रूटचे नाबाद शतक आणि त्याने जेम्स अँडरसनसोबत केलेल्या दहाव्या विकेटसाठीच्या १९८ धावांच्या विक्रमी भागीदारीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशी शनिवारी इंग्लंडने ४९६ धावा करताना पहिल्या डावात ३९ धावांची आघाडी होती.

९ बाद ३५२ वरून पुढे खेळताना यजमान १४४ धावांनी पिछाडीवर होते. रूटवर त्यांच्या सर्वाधिक आशा होत्या. त्याने तळातील अँडरसनसह पहिले सत्र खेळून काढताना भारताच्या आघाडी घेण्याच्या आशांवर पाणी फेरले. रूटने चौथे शतक झळकावताना नाबाद १५४ धावांची चमकदार खेळी केली. त्याने जवळपास साडेसहा तास खेळपट्टीवर टिकून राहताना १५ चौकार लगावले. रूटला तळातील अँडरसनची चांगली साथ लाभली. त्याने पहिलेवहिले कसोटी अर्धशतक ठोकताना कारकीर्दीतील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या रचली. अँडरसनने ८१ धावांची बहुमुल्य खेळी करताना १७ चौकार मारले. भारतातर्फे मध्यमगती भुवनेश्वर कुमार (५ विकेट) सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याला इशांत शर्मा (३ विकेट) आणि मोहम्मद शामीची (२ विकेट) सुरेख साथ लाभली. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि स्टुअर्ट बिन्नीला एकही विकेट घेता आली नाही.

Leave a Comment