मेट्रोला केंद्राकडून निधी नाही ;मग ‘कारभारी’ काय करणार – अजित पवार

ajitpawar
पुणे – लखनौ, अहमदाबादच्या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारतर्फे निधी जाहीर केला जातो; पण पुण्याच्या मेट्रोसाठी तरतूद होत नाही. नेहरू योजनेतून अपूर्ण प्रकल्पांना निधी मिळणार का, हे केंद्रीय बजेटमधून स्पष्ट होत नाही. केंद्र सरकारच निधी देणार नसेल, तर तिथे कारभारी काय करणार’, अशी विचारणा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला निधी न मिळाल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडले. तसेच, मेट्रोच्या निधीसाठी पुण्याच्या खासदारांनी पाठपुरावा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

पुणे महानगरपालिकेतर्फे भामा-आसखेड धरणातून शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजनेचे भूमीपूजन शनिवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. विमाननगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग रिंगचे उदघाटन तसेच महावितरणच्या पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमीपूजन पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी पवार म्हणाले ,पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी भाजपचे खासदार आहेत, तरीही पुणे-नाशिक रेल्वेसाठी तरतूद का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शहराच्या मेट्रो प्रकल्पासह या भागातील इतर प्रश्नांसाठी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे आणि इतर विरोधी पक्षाचे सहकारी निश्चित पाठपुरावा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने तरतूद केल्यावर त्या प्रमाणात मेट्रोसाठी तरतूद करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी केलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करायला हवे, याचा पुनरूच्चार त्यांनी केला. तसेच, राज्याच्या बहुतांश भागांत अपुऱ्या पावसाअभावी पाणीपुरवठ्याची स्थिती बिकट झाली असल्याचे सांगून, पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment