ब्रासिलिया – फिफा विश्वचषकाच्या तिस-या क्रमांकाच्या लढतीत ब्राझील स्पर्धेचा शेवट गोड करेल अशी ब्राझीलवासियांची अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाही पूर्ण करण्यात ब्राझील संघाला पुन्हा एकदा अपयश आले. तिस-या स्थानासाठी रविवारी ब्राझील आणि हॉलंडदरम्यान रंगलेल्या सामन्यात हॉलंडने ब्राझीलचा ३-० ने धुव्वा उडवला. यविजयासोबतच हॉलंडने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले आहे.
फिफा विश्वचषकाच्या तिस-या स्थानी हॉलंड
अर्जेंटिनाकडून पराभूत झालेल्या हॉलंडने पहिल्या तीन मिनाटातच ब्राझीलविरुद्ध गोल करत आपले खाते उघडले. हॉलंडचा कर्णधार व्हॅन पर्सीने मिळालेल्या पेनल्टीच्या आधारे पहिला गोल केला. त्यानंतर सतराव्या मिनिटाला हॉलंडच्या ब्लिंडने दुसरा गोल करत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. प्रथम सत्रात ही आघाडी कायम ठेवण्यात हॉलंडला यश मिळाले.
दुस-या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या दिशेने जोरदार प्रयत्न केले. मात्र कोणासही यश आले नाही. अखेर शेवटच्या मिनिटात विश्नाल्डमने आणखी एक गोल करत सामन्यातील विजय निश्चित केला. गेल्या दोन सामन्यात ब्राझीलला केवळ एका गोल करता आला आहे.