सीमा शुल्क विभागाने केले ५३५ किलो सोने जप्त

gold
मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मागच्या काही महिन्यांमध्ये सीमा शुल्क विभागाने मोठया प्रमाणावर सोने जप्त केले असून, यावरुन मुंबई विमातळावर सोने तस्करीच्या घटना वाढल्याचे स्पष्ट होते.

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने मागच्या सहा महिन्यात जानेवारी ते जून दरम्यान सोने जप्तीचे पाचशे गुन्हे दाखल केले आहेत. पंधरावर्षातील सर्वाधिक सोने या सहा महिन्यांमध्ये जप्त केले आहे.

सीमा शुल्क अधिका-यांनी सहा महिन्यांमध्ये ५३५ किलो सोने जप्त केले आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात सर्वाधिक ३२३ किलो सोने जप्त करण्यात आले.

१९८८-८९मध्ये मुंबई विमानतळावरुन सर्वाधिक ८०० किलो सोने जप्त करण्यात आले होते. यावर्षी हा विक्रम मोडला जाईल असा अधिका-यांना विश्वास आहे. एप्रिल ते जून मध्ये ३२३ किलो सोने पकडणा-या अधिका-यांचे वरिष्ठांनी विशेष कौतुक केले.
मागच्यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत फक्त ५५ किलो सोने पकडले होते. यावर्षी हाच आकडा सहापटीने जास्त आहे. यावर्षी सोने तस्करीचे एकहजारहून अधिक गुन्हे दाखल होतील असा सीमाशुल्क अधिका-यांचा अंदाज आहे.

Leave a Comment