मोदींची संपली आता राजची हवा

raj2
सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेचे नेते आपल्या संपर्कात कोण कोण आहे याची यादी द्यायला लागले आहेत. कारण देशात मोदी लाट आहे आणि तिच्यावर सवार होण्यासाठी शिवसेनेत किंवा भाजपात जाऊन निवडणूक लढवली पाहिजे असे सर्वांना वाटायला लागले आहे. ही गोष्ट
सध्याच्या मूल्यहीन राजकारणात साहजिक आहे पण मनसेच्या काही नेत्यांनी आपल्याही संपर्कात काही लोक आहेत अशी थाप ठोकायला सुरूवात केली आहे. याचा अर्थ राज्यातले काही नेते मनसेत यायला उत्सुक आहेत असा होतो. ही गोष्ट आपण बातमी म्हणून ऐकण्याऐवजी करमणूक म्हणून ऐकायला काही हरकत नाही. कारण मनसे आणि आम आदमी पार्टीत कोणी येण्याच्या ऐवजी त्यातून बाहेर अनेक लोक पडत आहेत. नाशिकमध्ये अशा बाहेर पडणार्‍यांची समजूत घालण्यासाठी राज ठाकरे यांना स्वत:ला जावे लागले. ही सारी फूट समोर येत असतानाच राज ठाकरे मात्र पक्षात वाढ होत असल्याच्या थापा ठोकत आहेत. आपल्या दृष्टीने त्या थापा असल्या तरी मनसे आणि राज ठाकरे यांच्यादृष्टीने ते खरे आहे कारण नरेन्द्र मोेदी यांची लाट ओसरत असून राज ठाकरे यांची लाट वाढत आहे असे त्यांना मनापासून वाटत आहे.

राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या युवकांच्या सभेत बोलताना पुन्हा एकदा असेच शब्दांचे बुडबुडे फोडले. त्यांनी आजवर अनेक सभा घेतल्या आणि अनेक वल्गना केल्या पण त्यांना अजूनही आपल्या मनसेने काय दिवे लावले याचे एकही उदाहरण सांगता आलेले नाही. एक काळ असा होता की, राज ठाकरे हे चांगले वक्ते ( आणि केवळ वक्तेच) आहेत असे म्हटले जात होते पण त्यांचा हाही महिमा आता कमी होत चालला आहे. कारण एक दोन शिवराळ भाषणे करणे सोपे असते. त्यावरून चांगला वक्ता असल्याचे लोकांना भासवणे शक्य होते पण अनेक विषय समोर यायला लागतात, देशाच्या अर्थकारणात काही नवे वाद निर्माण होतात तेव्हा असले वक्ते उघडे पडत असतात. कधी भारतीय घटनेच्या ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित होतो, देशाचे अंदाजपत्रक सादर होते अशा प्रत्येक वेळी चांगला वक्ता म्हणवणार्‍यांनी त्या त्या विषयावर आपली मते व्यक्त केली पाहिजेत. तरच त्यांची राजकीय भूमिका काय आहे याचा कार्यकर्त्यांना पत्ता लागतो. देशात एवढे विषय उपस्थित झाले असूनही राज ठाकरे यांनी कधीही त्या त्या विषयाचा आपला व्यासंग आहे हे दाखवून देणारे मतप्रदर्शन केलेले नाही. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवर तर सोेडाच पण, राज्याच्या विकासावरही त्यांनी कधी मूलगामी विवेचन केले नाही. एकदा अपवाद म्हणून त्यांनी काही वृत्तपत्रांची कात्रणे हातात घेऊन भाषण करून दाखवले होते. अशा लोकांना काही लोकांना काही दिवस भुरळ पाडता येते पण समाजाला किंवा आपल्या पक्षालाही दिेशा देता येत नाही. राज ठाकरे यांच्यासारखे उथळ आणि शिवराळ वक्ते या राज्यात अनेक आहेत पण राज ठाकरे आडनावाचा काही फायदा मिळून ते राजकारणात चार दिवस आता करत आहेत तेवढी चुळबुळ तरी करीत आहेत. पण येत्या काही वर्षात त्यांचा या राजकारणात काही मागमूसही राहणार नाही कारण एखादा पक्ष स्थापन करून त्याला राजकारणाच्या केन्द्रस्थानी आणण्यासाठी लागते ती क्षमता आणि आवाका त्यांच्याकडे नाही. त्यांनी आता मोदी यांच्या लोकप्रियतेची चर्चा सुरू केली आहे. मोदी यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील असे स्पष्टच केले होते कारण कॉंग्रेसच्या सरकारने अनेक चुकीचे पायंडे पाडून सरकारी तिजोरीला भोके पाडली आहेत. त्यांच्या त्या चुका दुरुस्त कराव्या लागतीलच. एक हजार रुपयांची गॅस टाकी लोकांना पाचशे रुपयांना दिली जात आहे. तिच्या पोटी सरकारला दरसाल ७२ हजार कोटी रुपये खर्च करावा लागतो. सरकार असा खर्च करीत असतानाच सरकारकडे सडका करायला पैसा रहात नाही आणि मग तो रस्ता खाजगी कंत्राटदाराकडून करून घ्यावा लागतो.

अशा रस्त्यावर टोल द्यावा लागतो. लोकांना टोल कराचा जाच वाटतो पण त्यांना हे कळत नाही की इकडे टोल घेतला जात असला तरी तिकडे गॅस निम्म्या किंमतीला मिळत असतो. लोकांना हे समजावून सांगावे लागते आणि गॅसवर दिल्या जाणार्‍या सबसिडीला काही प्रमाणात का होईना पण रोख लावावा लागतो. त्यामुळे लोकांत नाराजी पसरते पण ही कारवाई त्यांच्याच फायद्याची असते. अशा वेळी काही प्रमाणात लोकप्रियता घटणार हे मोदींनाही माहीत असते. पण या मागचे कारण राज ठाकरे यांना समजत नाही कारण तो त्यांचा विषयच नाही. मोदी यांची लोकप्रियता त्यांच्या योग्य निर्णयामुळे काही प्रमाणात घटली आहे. कॉंग्रेसने निर्माण केलेल्या अनेक चुकांचा तो परिणाम आहे. मात्र मोदी काही तरी करीत आहेत. काम करताना एखादा निर्णय चांगला असेल किंवा एखादा निर्णय वाईटही असेल. शेवटी काम करणाराच चुकत असतो. राज ठाकरे कसलेच काम करीत नाहीत. ते कामच करीत नसल्याने त्यांची काही चूक होत नाही आणि त्यांची काही चूक होत नसल्याने ते सर्वांना नावे ठेवत असतात. ते मोदींच्या बाबतीत बोलत आहेत पण शेवटी मोदी देशाचे काम करीत आहेत. राज ठाकरे यांना साधे नाशिक शहरात आपले दोन वर्षात कसलेच काम दाखवता आलेले नाही. अशी कामगिरी करणे हा व्यासंगाचा परिणाम असतो. त्यासाठी वाचन करावे लागते. चिंतन असावे लागते. या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडे अभावानेही नाहीत. त्यामुळे ते नाशिक महापालिकेत कधीही आपली कार्यक्षमता दाखवू शकणार नाहीत. नाशिकमध्ये त्यांना काहीही करता आलेले नाहीच पण त्यांना तिथे आपला पक्ष आणि पक्षाशी युती करणारे भाजपाचे नगरसेवक यांनाही नीट सांभाळता आलेले नाही. मोदींची लोकप्रियता घटलीय की वाढलीय याची चर्चा राज ठाकरे यांनी करूही नये.

Leave a Comment