महागाईचा आगडोंब; भाज्या कडाडल्या

tomato
मुंबई – कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे सामान्यांना ठसका लागलेला असतानाच उत्तम प्रतीचा टोमॅटोही मागील आठवडय़ापासून भाव खाऊ लागला आहे. एरव्ही स्वस्त असलेला वाटाणाही किलोमागे १००च्या घरात पोहोचला आहे. जूनच्या अखेपर्यंत या दोन्ही भाज्यांचे भाव स्थिर होते. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवडय़ातच त्यांच्या घाऊक दरांत वाढ झाली आहे. निव्वळ आवक घटल्यामुळेच भाज्यांचे दर टोक गाठू लागले आहेत.

जुलैच्या पहिल्या आठवडय़ात घाऊक बाजारात २२ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता ४० रुपयांना मिळत आहे. अवघ्या सात दिवसांत टोमॅटोने किलोमागे १८ रुपयांची उसळी घेतली आहे. कांदा-टोमॅटो महाग झाला असताना काकडीच्या दरानेही किलोमागे सात रुपयांची उंची गाठल्याने सामान्यांसाठी कोशिंबीर महाग ठरू लागली आहे. मुंबई-ठाणे परिसराला नाशिक जिल्ह्य़ातून भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. मात्र, वरुणराजा रुसल्यामुळे भाज्यांची ही आवक घटली आहे. त्याचा परिणाम भाज्यांचे दर वाढण्यात होऊ लागला आहे. असे असले तरी टोमॅटोच्या दरात झालेली वाढ आश्चर्यजनक आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात हाच टोमॅटो वाशीच्या घाऊक बाजारात आठ रुपये किलोने विकला जात होता.

या भाववाढीमागे अपुरा पाऊस हेच कारण असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर झालेल्या वाढीमागे कोणतेही गौडबंगाल नसून नारायणगाव व नाशिकमधून मुंबईला होणारी टोमॅटोची आवक निम्म्यावर आल्याचा हा परिणाम असल्याचे एपीएमसी बाजारातील तानाजी पाटील या टोमॅटो व्यापाऱ्याने सांगितले. सध्या बंगळुरूहून येणाऱ्या टोमॅटोवर मुंबईकरांना गुजराण करावी लागत असल्याचे अशोक चौरसिया या अन्य एका टोमॅटो व्यापाऱ्याने स्पष्ट केले.

Leave a Comment