कोकणात आता ‘राजकीय वादळ’; सेनेच्या वाटेवर केसरकर ?

deepak
सिंधूदुर्ग – आज कोकण किनारपट्टीवर हवामान खात्याने वादळी वाऱयासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यातच कोकणात राजकीय क्षेत्रात वादळ उठविणारे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांच्यासाठी कर्दनकाळ ठरले होते आणि सध्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सूत्रांकडून समजते.

केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान निलेश राणे यांच्याविरोधात उघडपणे प्रचार केला होता आणि त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरले. सिंधूदुर्ग आणि सावंतवाडी परिसरात केसरकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केली होती. त्यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या वर्षाच्या शेवटी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केसरकर शिवसेनेची वाट धरण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील केसरकर यांची स्तूती करून अप्रत्यक्षरित्या त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रणच दिले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतल्यानंतरच केसरकर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. केसरकर यांनी सेनेत प्रवेश केला तर कोकणात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसेल यात शंका नाही.

Leave a Comment