सौ. ठाकरेंच्या नावाने खंडणी

rashim
मुंबई – मुंबईच्या क्राईम ब्रँचने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावाने खंडणी मागणाऱ्या महिलेसह तीन जणांना अटक केली आहे. या टोळीने या आधीही अनेकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या गुन्हे शाखेने सापळा रचून लाजवंती उर्फ लीना गोवर्धन हरदासानी या महिलेसह आणखी दोघांना अटक केली आहे.

या आरोपींनी लोकसभा निवडणूकीदरम्यान गोरेगाव पुर्वेकडील एका बांधकाम व्यावसायिकाला २५ लाखांची खंडणी मागीतली होती. मात्र, या व्यावसायिकाने खंडणी दिली नाही. या महिलेने त्याला फोन केला आणि आपण रश्मी ठाकरे बोलत असल्याचे सांगितले.

मागीतलेली रक्कम तुम्ही दिली नाही. आता तर आमची सत्ता आली असल्याने आता आम्ही बघून घेऊ अशी धमकी या महिलेने दिली. जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुमच्या कार्यालयात स्फोट घडवुन आणू अशीही धमकी बांधकाम व्यावसायिकाच्या मॅनेजरला दिली होती.
आता माझा माणूस येईल त्याला २५ लाख द्या असे या महिलेने सांगितले. यावेळी क्राईम ब्रँचने सापळा रचून आरोपी प्रकाश मेहता याला रंगेहाथ अटक केली.

यातील तीसरा आरोपी सिद्धेश सामंत हा सराईत गुन्हेगार असून त्याने अनेक राजकिय नेत्यांची नावे सांगून लाखो रुपयांच्या देणग्या मिळवल्या असल्याचही समोर आले आहे. न्यायालयाने या तिघांनाही १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment