शहरी लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली दुस-या स्थानावर

delhi
संय़ुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्राने जागतिक शहरीकरणासंबंधी आपला अहवाल प्रसिध्द केला असून, या अहवालानुसार टोकियो पाठोपाठ भारतातील दिल्ली शहर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये दुस-या क्रमांकावर आहे. टोकियो ही जपानची, तर दिल्ली शहर भारताची राजधानी आहे.

दिल्लीची लोकसंख्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार १९९०मध्ये सव्वाकोटी होती, पण आता ती दुप्पट झाली आहे. सध्या दिल्लीची एकूण लोकसंख्या अडीचकोटीच्या घरात आहे.

या अहवालानुसार २०५० मध्ये चीनपेक्षाही जास्त भारताची शहरी लोकसंख्या असेल. दिल्ली २०३० पर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये दुस-या स्थानावर राहील त्यावेळी दिल्लीची लोकसंख्या साडेतीनकोटी पेक्षाही जास्त असेल असे या अहवालात म्हटले आहे.

सध्याच्या घडीला टोकियो हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. टोकियोची एकूण लोकसंख्या ३.८ कोटी आहे. येत्या काही वर्षांमध्ये यामध्ये घट होईल. २०३० पर्यंट टोकियो सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये पहिल्या स्थानावर राहील. यावेळी टोकियोची लोकसंख्या ३.७ कोटी असेल.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मुंबई सहाव्या स्थानावर आहे. सध्या मुंबईची लोकसंख्या २.१ कोटी आहे. २०३० पर्यंत ही लोकसंख्या २.८ कोटी होईल त्यावेळी जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये मुंबई चौथ्या स्थानावर असेल. टोकियो, दिल्लीपाठोपाठ चीनचे शांघाय शहर २.३ कोटी लोकसंख्येसह तिस-या स्थानावर आहे.

Leave a Comment