पृथ्वीराजांचे स्थान अढळ

chavan
मुंबई – मंहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण हेच कायम राहणार आहेत. इतकेच नव्हे तर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मोहन प्रकाश यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकांतील दारूण पराभवानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची मागणी महाराष्ट्रातील कांही काँग्रेस नेत्यांकडून केली जात होती आणि लवकरच महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा होती. मात्र प्रकाश यांच्या घोषणेनंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी काल दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती व त्यानंतर ते राहुल गांधी यांनाही भेटले होते. राहुल यांच्या भेटीनंतर पृथ्वीराजच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहतील अशी घोषणा केली गेली आहे. नेतृत्वबदलाबाबत काँग्रेसच्या वरीष्ठ समितीत झालेल्या चर्चेत ऐत्या वेळचा नेतृत्वबदल जास्ती नुकसानकारक ठरू शकेल असे मत नोंदविण्यात आले होते असेही समजते. त्यामुळे चव्हाण यांचे पद कायम ठेवण्यात आले असल्याची चर्चा आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी सोनिया गांधींबरोबरची बैठक चांगली झाल्याचे सांगतानाच महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकाच्या तयारी संबंधी चर्चा झाल्याचेही सांगितले आहे.

Leave a Comment