आफ्रिकेवर विजयासह लंकेची मालिकेत बरोबरी

lanka
पल्लेकेले : लंकेने दुसऱया वनडे सामन्यात तिलकरत्ने दिलशानच्या अष्टपैलू खेळामुळे दक्षिण आफ्रिकेवर 87 धावांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दिलशानने 86 धावा व 40 धावांत 3 बळी मिळविले.

लंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करीत 49.2 षटकांत त्यांचा डाव 267 धावांत आटोपला. दिलशाने प्रथम 90 चेंडूत 86 धावांचे योगदान देत संघाला अडीचशेपारची मजल मारून दिली. त्यानंतर आमला व डीव्हिलियर्स ही जमलेली जोडी फोडताना डीव्हिलियर्सला बाद करीत लंकेच्या विजयाचा मार्ग सोपा केला. द.आफ्रिकेला त्यांचे आव्हान पेलवले नाही आणि 38.1 षटकांतच त्यांचा डाव 180 धावांत आटोपला. आफ्रिकेच्या डावात फक्त तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. आमलाने सलग दुसरे शतक झळकवताना 102 चेंडूत 101 धावा केल्या. 20 व्या षटकात 2 बाद 101 अशी स्थिती असताना डीव्हिलियर्सला दिलशानने मोहात पाडले. उत्तुंग फटका मारताना तो लाँगॉनवर झेलबाद झाला. आमला-डीव्हिलियर्स जोडीने 75 धावांची भागीदारी केली.

ही जोडी फुटल्यानंतर त्यांचा डाव गडगडला आणि केवळ 26 धावांत 5 बळी गमविले. त्यातील तीन बळी दिलशानने मिळविले. आमला आठव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. आमलाने या सामन्यात 14 वे वनडे शतक पूर्ण केले. पण यावेळी ते अपयशी ठरले. याआधीच्या 13 शतकांवेळी त्याच्या संघाने विजय मिळविला होता. डीव्हिलियर्सने 29, स्टीनने 23 धावा केल्या. अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. मालिंगाने 24 धावांत 4, अजंथा मेंडिसने 18 धावांत 2 बळी मिळविले. लंकेच्या डावात थिरिमनेने 36, जयवर्धनेने 48, मॅथ्यूजने 34, प्रियंजनने 25 धावा जमविल्या होत्या. आफ्रिकेच्या रेयान मॅक्लारेनने 48 धावांत 4 बळी घेतले तर इम्रान ताहिर व फिलँडर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. शनिवारी शेवटचा सामना होणार आहे.

Leave a Comment