राज यांनी मारला यू टर्न, म्हणाले मोदींची हवा विरली

raj
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत ज्या नरेंद्र मोदी यांच्या नावावर स्वार होत भाजपाने ऐतिहासिक विजय संपादन केला, त्या मोदी यांची हवा आता विरली असल्याची टीका केली. लोकसभा निवडणुकीत मोदी यांना राज यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आता मोदी यांच्या विरोधात मत व्यक्त करीत त्यांनी यू टर्न मारला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान ज्या सोशल मिडियाने मोदींना उचलून धरले तोच सोशल मिडिया आता त्यांच्याविरोधात लिहित आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका, असा सल्ला राज यांनी युवक कार्यकर्त्यांना दिला. राजकारणात दुकानदारी नको. राज्यात बदलाचे वारे वाहत आहेत. हा बदल ओळखून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याची अप्रत्यक्ष सूचनाच त्यांनी युवक कार्यकर्त्यांना दिली.

राज यांनी काही दिवसांपूर्वी आपण निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगत स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणूनही जाहीर केले होते. त्यामुळे मोदी यांच्या विरोधातील विधान ही आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याचेच मानले जात आहे.

Leave a Comment