परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून इस्त्रोला ४ कोटी युरो

isro
दिल्ली- देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्त्रोने २०११ सालापासून आजतागायत १५ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत आणि त्यातून संस्थेला ४ कोटी युरोचा महसूल मिळाला असल्याचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात लेखी दिले आहे.

जितेंद्र सिंग यांच्या उत्तरानुसार इस्त्रोने या काळात १५ परदेशी उपग्रहांसह १४ भारतीय उपग्रहही प्रक्षेपित केले आहेत. तसेच संस्थेने भविष्यातील म्हणजे २०२० पर्यंत देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचा आराखडा तयार केला आहे. त्यात अॅडव्हान्स लाँच सिस्टीम विकास, पृथ्वीच्या निरीक्षणासाठी तसेच हवामान संशोधन, प्रादेशिक नेव्हीगेशन साठी उपग्रहांचा समूह लाँच करण्यात येणार आहे.

इस्त्रोने भारताच्या पहिल्या मंगळयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले असून हे यान मंगळाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. ही वाटचाल पूर्णत्वास गेली तर मंगळावर यान पाठविणारा भारत चौथा देश बनणार आहे. अंतराळात मानव पाठविण्यासबंधीची तयारीही संस्थेत सुरू असल्याचे सांगून जितेंद्र सिंग म्हणाले की मंगळयानासाठी आत्तापर्यंत ३४९ कोटी रूपये खर्च झाले असून या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ४५० कोटी आहे.

Leave a Comment