आरोग्यदायी जगणे म्हणजे दररोज जीमला जाणे आणि तिथे जाऊन व्यायाम करणे एवढेच नसते. त्यासाठी बर्याच गोष्टींची पथ्ये पाळावी लागतात. दैनंदिन जीवनात काही गोष्टी कटाक्षाने कराव्या लागतात, शरीराकडे लक्ष ठेवावे लागते. त्याच्या तंदुरुस्तीसाठी वेळ द्यावा लागतो. आपण आणि आपले आरोग्य याविषयी सातत्याने विचार करावा लागतो. खालील काही सूचना त्यासाठी गरजेच्या आहेत.
आरोग्यदायी जगण्यासाठी…
१) भरपूर पाणी प्या – आपल्या शरीरासाठी पाण्याची फार गरज आहे. कारण आपले ६० टक्के शरीर पाण्याने तयार झालेले असते. शरीराच्या सर्व क्रीया नीट चालाव्यात यासाठी पाणी गरजेचे असते. पाणी आपल्या शरीरातील घाण बाहेर काढते आणि अन्नातून पोषण द्रव्ये शोषून घेण्यास सहाय्य करते. म्हणून दिवसभरात भरपूर पाणी पिले पाहिजे. लघवी, शौच्य, घाम आणि श्वास यातून शरीरातले पाणी जात असते. त्याची भरपाई केली पाहिजे. भरपूर पाणी पिल्याने वजन सुद्धा कमी होते.
२) भरपूर फळे खा – निरोगी जीवनासाठी आरोग्यदायी फळे खाल्ली पाहिजेत. त्यातून आपल्या शरीराला जीवनसत्वे आणि पोषण द्रव्ये मिळतात. निसर्गाने दिलेली फळे शक्यतो तशीच खावीत. मात्र बाजारातील हंगामानुसार येणारी फळेही खावीत. ३) व्यायाम करा – शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामाची सुद्धा गरज असते. जमेल तेवढा पण किमान २० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. शक्य तेवढे चालले पाहिजे.
४) भरपूर विश्रांती घ्या – आपले शरीर काम करून थकत असते आणि त्याची झीज होत असते. ती भरून काढण्यासाठी भरपूर विश्रांतीची गरज आहे. निदान आठ तास झोप न घेतल्यास आपले डोळे, केस, टाचा, हात-पाय यांचे त्रास सुरू होतात. मद्यपान टाळणे, धूम्रपान सोडून देणे आणि दिवसातून थोडी मिनिटे का होईना पण ध्यान करणे हेही आरोग्यासाठी गरजेचे आहे.