संघाचे वाढते नियंत्रण

bjp
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून राजनाथ सिंह यांच्याजागी अमित शहा यांची निवड करण्यात आली आहे.
अमित शहा हे संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे ते संघाच्या आशीर्वादामुळेच अध्यक्ष झाले आहेत निर्विवाद आहे आणि संघाने हा बदल करताना भारतीय जनता पार्टीवरचे आपले वर्चस्व वाढवत नेले आहे. या पूर्वी सुरेश सोनी यांना भाजपात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोनी हे संघाचे प्रचारक आहेत आणि त्यांच्या मार्फत संघ भाजपावर नियंत्रण ठेवणार आहे. हा बदल झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते असलेल्या राम माधव यांना भाजपाचे सरचिटणीस करण्यात आले आहे. म्हणजे एक प्रकारे भाजपावरचे संघाचे वर्चस्व किंवा नियंत्रण हे असे थेट झालेले आहे. अमित शहा यांना अध्यक्ष केल्यामुळे पंतप्रधान आणि अध्यक्षपद ही दोन्ही पदे एकाच राज्याकडे म्हणजे गुजरातकडे गेली आहेत. त्यामुळे पक्षात काही खळबळ माजली आहे की काय याची चाचपणी करण्यासाठी काही विशिष्ट पत्रकारांनी कान टवकारले आहेत. परंतु पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष या दोन्ही पदांवरची या दोघांची ही निवड पूर्णपणे गुणवत्तेच्या निकषावर झाली असल्यामुळे पक्षात तशी काही चर्चा सुरू नाही.

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदासाठी आवश्यक असलेले गुण आपल्यात असल्याचे दाखवून दिले आहेच. शिवाय अमित शहा यांनीसुध्दा आपल्या संघटन कौशल्याचे प्रत्यंतर आणुन दिलेले आहे. तेव्हा संघ परिवारात किंवा भाजपात अशा प्रांतवादाला अजिबात थारा मिळणार नाही. अमित शहा यांच्या निवडीचे सर्वांनी मनमोकळेपणे स्वागत केले आहे. राजनाथ सिंह यांनी या पदाची सूत्रे हाती घेऊन सहाच महिने झाले होते. परंतु ते आता केंद्रीय गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या दीड वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी अमित शहा यांना नेमण्यात आले आहे. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठी कामगिरी बजावली आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या क्षणाला नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले त्याचवेळी अमित शहा यांना उत्तर प्रदेश निवडणूक यंत्रणेचे प्रमुख म्हणून नेमल्याची घोषणा करण्यात आली. कदाचित नरेंद्र मोदी यांचाच तसा आग्रह असावा. कारण मोदी यांना सत्तेवर यायचे असेल तर उत्तर प्रदेश सर्वाधिक महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवावे लागेल असे त्यांचे मत होते. भारताच्या आजवरच्या पंतप्रधानांपैकी एक दोन अपवाद वगळता बहुतेक पंतप्रधान उत्तर प्रदेशातून निवडून आलेले आहेत.

ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि या राज्याचा प्रभारी म्हणून आपल्या खास विश्‍वासातले श्री. अमित शहा यांना नेमण्याचा आग्रह धरला. उत्तर प्रदेशात भाजपाची स्थिती फार वाईट होती. २००९ साली राज्यातल्या ८० जागांपैकी केवळ ९ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. अशा अवस्थेत उत्तर प्रदेशाच्या जोरावर दिल्ली काबीज करायची असेल तर उत्तर प्रदेशातून कमीत कमी ४५ आणि जास्तीत जास्त ५५ जागा मिळवाव्या लागतील असा हिशोब मांडण्यात आला होता. ते आव्हान स्वीकारून अमित शहा कामाला लागले. भारताच्या राजकारणाविषयी नेमके आकलन असणारे राजकीय पंडित फार दुर्मिळ आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ज्या ज्या संस्थांनी मतदारांची सर्वेक्षणे केली त्या संस्थांपैकी एकाही संस्थेने उत्तर प्रदेशात भाजपाला किती यश मिळेल याचा नेमका अंदाज व्यक्त केला नव्हता. कोणतीही सर्वेक्षण करणारी संस्था उत्तर प्रदेशात भाजपाला ५५ जागा मिळतील असेसुध्दा म्हणायला तयार नव्हती. पण प्रत्यक्षात अमित शहा यांनी तिथे अशी काही फिल्डिंग लावली की ८० पैकी ७३ जागा भाजपाला मिळाल्या.

खरे म्हणजे उत्तर प्रदेशातल्या सगळ्याच भाजपाला मिळाल्यात जमा आहेत. फक्त सोनिया गांधी, राहुल गांधी, मुलायम सिंग (२) आणि मुलायम सिंग यांच्या घरातील ३ लोक अशा ७ जागा त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक प्रभावाखाली त्यांना मिळाल्या आहेत. बाकी सगळ्या जागा भाजपाने जिंकल्या आहेत. अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात कधीही लाखाची किंवा दोन लाखांची सभा घेतली नाही. त्यांची जात उत्तर प्रदेशातल्या लोकांना आकृष्ट करणारी नाही. पण तरीसुध्दा त्यांनी जवळपास सहा महिने उत्तर प्रदेशाच्या लहान लहान गावातून आणि तालुक्यातून छोट्या छोट्या मेळाव्यांमध्ये लोकांशी संवाद साधून अतीशय गुप्त असा प्रचार केला आणि हे यश मिळवले. त्यामुळे आता राजनाथ सिंह यांच्याजागी नवा अध्यक्ष निवडण्याची वेळ आली तेव्हा अ अमित शहा यांची एकमुखाने निवड झाली. आता भारतीय जनता पार्टीला अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र तसेच शक्य झालेच तर दिल्ली या विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली याही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला उज्ज्वल यश मिळेल अशी अपेक्षा आहे. अमित शहा हे संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक आणि उत्तम संघटक आहेत. त्यामुळे ते भारतीय जनता पार्टीची संघटना व्यवस्थित चालवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment