रिमोटने नियंत्रित होणारे गर्भनिरोधक विकसित

pregnancy
अमेरिकेतील मॅसेच्यूसेटस विश्वविद्यालयातील संशोधकांनी संगणकाच्या चीपवर आधारित गर्भनिरोधक विकसित केले आहे. हे गर्भनिरोधक रिमोटच्या सहाय्याने नियंत्रित करता येते. म्हणजे हवे असेल तेव्हा सुरू करता येते व कुटुंबनियोजन थांबवून मूल हवे असेल तर बंदही करता येते. पुढील वर्षात या गर्भनिरोधकाच्या क्लिनिकल टेस्ट सुरू होत असून २०१८ सालापर्यंत ते बाजारात आणले जाणार आहे. सर्वसामान्यांना परवडणार्‍या किंमतीत ते उपलब्ध होणार आहे. बिल गेटस फौंडेशनने या संशोधनासाठी निधी पुरविला असल्याचे समजते.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या त्वचेखाली ही चीप बसविली जाते. त्यात गर्भप्रतिबंधक हार्मोन असलेली मायक्रो चीप असते. त्यातून या हार्मोनची निश्चित स्वरूपातील मात्रा महिलेच्या शरीरात सोडली जाते. सतत १६ वर्षे ही चीप ठेवली तरी चालते. मात्र मध्येच कुटुंबनियोजन थांबवून कुटुंबविस्तार करायचा असेल तर बाहेरूनच ही चीप बंद करता येते. आज शरीरात बसविण्याची अनेक गर्भनिरोधक साधने आहेत मात्र पुन्हा मूल हवे असेल तर महिलेला रूग्णालयात जाऊनच गर्भनिरोधक काढावे लागते.

ही चीप २० बाय २० बाय ७ मिमीची असून त्यात दीड सेंमी रूंदीची मायक्रोचीप बसविली गेली आहे. सध्या संशोधकांपुढे या चीपबाबत अजून एक आव्हान आहे. ते म्हणजे ही चीप बंद करणे अथवा सुरू करणे हे संबंधित महिलेशिवाय अन्य कोणाला शक्य होऊ नये हे. त्यासाठीही संशोधन सुरू असल्याचे समजते.

Leave a Comment