भारताची लडखडत सुरुवात

murli
नॉटिंगहॅम- भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी सलामीवीर मुरली विजयच्या शतकामुळे (खेळत आहे १२२) भारताने ४ बाद २५९ धावा केल्या. दिवस अखेर मुरली विजय (१२२ नाबाद) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (५० नाबाद) मैदानात खेळत होते.

पहिल्या दिवसाचे प्रमुख वैशिष्टय विजयची दमदार शतकी खेळी तसेच त्याने केलेल्या दोन अर्धशतकी भागीदा-या ठरले. पहिल्या षटकात जेम्स अँडरसनला तीन चौकार लगावत आक्रमक सुरुवात केली. मात्र दुस-या बाजूने शिखर धवन (१२) चाचपडताना दिसला. अँडरसनने यष्टिरक्षक मॅट प्रायरकडे त्याला झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर ‘वनडाउन’ चेतेश्वर पुजारासह दुस-या विकेटसाठी ७३ धावा जोडताना विजयने डाव सावरला. मात्र उपाहारानंतर पुजाराला (३८) बाद करत ही अँडरसनने जोडी फोडली.

पुजारानंतर पुढच्याच षटकांत भारताला विराट कोहलीला (१) गमवावे लागले. स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडला एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. परंतु, विजयला अजिंक्य रहाणेची सुरेख साथ लाभली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करताना चहापानापर्यंत भारताला ४ बाद १६८ धावा असे सुस्थितीत आणले.

चहापानानंतरच्या पहिल्याच षटकात लियाम प्लुंकेटने कर्णधार अ‍ॅलिस्टर कुककरवी रहाणेला बाद केले. अजिंक्यला ३२ धावाच करता आल्या. अन्य सहकारी माघारी परतत असतानाच सलामीवीर विजयने एक बाजू लावून धरताना चौथे कसोटी शतक झळकावले. २१४ चेंडूंत त्याने चमकदार शतकी खेळी साकारली. विजयच्या शतकात १८ चौकारांचा समावेश आहे. तत्पूर्वी, भारतातर्फे अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीने कसोटी पदार्पण केले.

जानेवारीत न्यूझीलंड दौ-याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करणा-या ३० वर्षीय स्टुअर्टकडे ४ वनडे लढतींचा अनुभव आहे. माजी मध्यमगती गोलंदाज आणि अष्टपैलू रॉजर बिन्नी यांचा स्टुअर्ट सुपुत्र आहे. चार मध्यमगतींसह पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निर्णयामुळे रोहित शर्माऐवजी स्टुअर्टला पसंती देण्यात आली. कर्णधार ढोणीच्या हस्ते स्टुअर्टला ‘टेस्ट कॅप’ देऊन गौरवण्यात आले.

Leave a Comment