पौर्णिमेदिवशी होते झोप कमी

fullmoon
लंडन – आपली झोप आणि तिच्या वेळा यांचा निसर्गाशी निकटचा संबंध असतो. एखादी व्यक्ती कधी झोपते आणि कधी उठते आणि किती तास किती शांत झोप घेते हे तिच्या शरीरातल्या बॉडी क्लॉकवर अवलंबून असते आणि या बॉडी क्लॉकच्या वेळांवर निसर्गाचा परिणाम होत असतो. म्हणूनच पौर्णिमेदिवशी प्रत्येक जण सरासरी २० मिनिटे कमी झोप घेतो असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. या दिवशी एकंदर झोपेचा वेळ २० मिनिटे कमी होतो हे तर खरे आहेच, पण त्या दिवशी झोप सुद्धा चांगली येत नाही.

आपण झोपतो तेव्हा पहिल्या तासातली झोप ही गाढ समजली जाते. या झोपेच्या अवस्थेत स्वप्ने पडत नाहीत. झोपलेल्या व्यक्तीच्या बुबळांच्या हालचाली सुद्धा फारशा होत नाहीत. पौर्णिमेदिवशी ही गाढ झोपेची अवस्था सुद्धा उशीरा प्राप्त होते. स्वीडनच्या गोतेनबर्ग विद्यापीठातील संंशोधक मायकेल स्मिथ यांनी या संबंधात संशोधन केले आहे. पौर्णिमेदिवशी झोपेचे बॉडी क्लॉक विस्कळीत झालेले असते असे त्यांना त्यांच्या संशोधनात आढळले आहे.

१८ ते ३० वर्षे वयोगटातील ४७ व्यक्तींवर त्यांनी या विषयाशी संबंधीत प्रयोग केलेले आहेत. लहानपणी आपल्याला चांगली झोप यावी म्हणून आई अंगाई गीत गाते, मात्र अशी कितीही गीते गायिली तरी मूल झोपत नाही असा अनुभव काही वेळा येतो. त्या दिवशी नेमकी पौर्णिमा आहे असे गृहित धरायला हरकत नाही.

Leave a Comment