पुण्यात स्फोट ,दोन जखमी;घातपाताचा पोलिसांना संशय

pune-bomb
पुणे – श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिरालगत असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंग झोनमध्ये गुरुवार दुपारी एका दुचाकीचा स्फोट झाला. हा स्फोट कशाचा झाला हे अजून निष्पन्न झाले नसले तरी घटनास्थळावर छरे आढळून आल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस आयुक्त सतीश माथुर यांनी स्फोट कशाचा आहे हे नंतर स्पष्ट केले जाईल असे पत्रकारांना सांगितले तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे.

शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या अत्यंत गजबजलेल्या भागात हा स्फोट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. हा स्फोट सौम्य स्वरूपाचा होता. त्यामुळे वाहनतळातील पाच ते सात वाहनांचे नुकसान झाले असून त्यात एक पोलीस हवालदार आणि एक वडापाव विक्रेता असे दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत.जखमींमध्ये एक महिला असल्याचेही कळते.

हा स्फोट कमी क्षमतेच्या स्फोटकांचा किंवा बॅटरीचा असण्याची शक्यता प्रारंभी व्यक्त करण्यात आली ,मात्र घटनास्थळावर छरे सापडल्याने पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे. पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी परिसराची तपासणी करण्याचे काम सुरू केले आहे. स्फोट नेमका कसा झाला याबाबत प्राथमिक तपासानंतरच माहिती देणे शक्य होईल, असे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितले.या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Leave a Comment