खरीप हंगाम ; देशात पेरण्यांच्या टक्केवारीत मोठी घट

farmer
नवी दिल्ली – चालू खरीप हंगामाच्या पेरण्यांच्या काळात मोसमी पावसाने दगा दिल्यामुळे भातशेतीच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झाला असून, आतापर्यंत देशभरात ४५.१२ लाख हेक्टर क्षेत्रावरच भातशेतीच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षी याच सुमारास देशभरात ६0.२३ लाख हेक्टर क्षेत्रावर भातशेतीच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.

डाळींच्या पेरण्यांतदेखील ४ जुलैपर्यंत ६६ टक्के घट झाली असून, १४.४९ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी याच सुमारास २१.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड करण्यात आली होती. तेलबियांच्या लागवडीही यंदा ७७ टक्के घट झाली असून, केवळ १४.४९ लाख हेक्टर क्षेत्रावरच तेलबियांची लागवड करण्यात आली आहे. तसेच भरड धान्यांच्या पेरण्यांतदेखील यंदा ५८ टक्के घट झाली असून, केवळ २७.९३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदा मोसमी पावसाचे प्रमाण ४३ टक्के घटले आहे. यामुळे उसाची लागवडदेखील ४३.९२ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. मागील वर्षी याच सुमारास ४५.२0 लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. यंदा देशभरात आतापर्यंत एकूण ३५.४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. मागील वर्षी याच सुमारास ५५.७७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. अशाप्रकारे यंदा खरीपाची एकूण लागवड १८२.४0 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. मागील वर्षी हे प्रमाण ३१८.९0 लाख हेक्टर होते. मागील वर्षी देशात उत्तम पाऊस झाला होता. परिणामी २६.४४ कोटी टन असे विक्रमी अन्नधान्य पिकले होते.

Leave a Comment