अमीत शहांची निवड शिवसेनेसाठी डोकेदुखी

amitshah
मुंबई- आक्रमक शैली आणि असामान्य संघटन कौशल्य असलेले मोदींचे विश्वासू अमीत शहा यांची भाजपच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेली निवड महाराष्ट्रातील भाजपला उत्साह देणार असली तरी शिवसेनेसाठी मात्र ही निवड डोकेदुखी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहा यांच्या निवडीमुळे शिवसेनेचे भाजपमधील मित्र समजले जाणारे लालकृष्ण आडवानी आणि सुषमा स्वराज यांच्या मताला आता किंमत राहिलेली नाही अशी भावना सेनेत बळावली आहे तसेच सेनेचे म्हणणे शांतपणे समजून घेणारे माजी अध्यक्ष राजनाथसिंह यांचेही सहाय्य आता सेनेला मिळणार नाही. परिणामी जागावाटपात सेनेला माघार घ्यावी लागेल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकांतील अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रातील विधानसभांसाठी सेनेबरोबर युती न करता स्वतंत्रपणे लढण्याची महाराष्ट्र भाजप नेत्यांची इच्छा आणि आग्रह आहे. अमीत शहा यांच्यापुढे नवीन पदभार घेतल्यानंतर पहिले आव्हान महाराष्ट्र आणि हरियानातील विधानसभा निवडणुकां हेच आहे. त्यातून शहा महाराष्ट्र, मुंबईतील परिस्थितीशी पूर्ण परिचित आहेत. शहा यांच्या अध्यक्षपदावरील निवडीमुळे मुंबईतील धनवान गुजराथी लोकांकडून भाजपला मोठ्या अर्थिक मदतीचा मार्ग सुकर झाला आहे. आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने त्यावर पकड मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशीलही आहे.

अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुका लढविताना सेनेला त्यांच्या जागांचा आग्रह कायम ठेवणे अशक्य होणार आहे. भाजप निम्म्या जागांसाठी आग्रही आहेच पण सेनेने त्यासाठी मान्यता दिली नाही तरी भाजप स्वतंत्रपणे लढण्यास तयार आहे. त्यात आता अमीत शहांच्या रूपाने त्यांना भक्कम आधार मिळाला आहे. त्यांच्या असामान्य संघटन कौशल्याचा फायदा भाजपला राज्यात नक्कीच होऊ शकेल असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे. मात्र सध्या राज्य भाजपने थांबा आणि पहा अशी भूमिका घेतली आहे.

Leave a Comment