जगातील सर्वात विशाल आकाराच्या पक्ष्याचे अवशेष शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ‘पेलागोर्निस सांडेर्सी’ असे नाव देण्यात आलेला हा पक्षी सुमारे अडीच कोटी वर्षांपूर्वीच्या कालावधीत पृथ्वीवर अस्तित्वात होता, असे आढळून आले आहे. पृथ्वीवरून डायनासोर नामशेष झाल्यानंतरचा हा कालखंड आहे. या पक्ष्याचे पंख बरेच मोठे असल्याने अवाढव्य आकार असतानाही त्याला एखाद्या ग्लायडरप्रमाणे आकाशात उडता येत होते, असे त्याच्या अवशेषांच्या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. दक्षिण कॅरोलिनामध्ये एका विमानतळाच्या बांधकामासाठी १९८३मध्ये सुरू केलेल्या एका खोदकामात या पक्ष्याचे अवशेष आढळून आले. हा पक्षी तब्बल २४ फूट म्हणते एखाद्या बसएवढा लांब होता. त्याचे वजनही ८१ किलोपर्यंत होते. जगातील सध्याचा सर्वात मोठा पक्षी रॉयल अव्बात्रोस याच्यापेक्षा हा पक्षी दुप्पट आकाराचा होता. आपल्या या विशाल आकारामुळे पेलागोर्निस सांडेर्सीला एखाद्या ग्लायडरसारखेच थोडे अंतर धावून गेल्यानंतरच उड्डाण घेता येत असेल, असा कयास शास्त्रज्ञांनी बांधला आहे. मात्र एकदा हवेत उडाल्यानंतर आपल्या विशाल पंखांमुळे त्याला उडण्यास काहीच अडचण येत नसे.