वारकऱ्यांनी ‘गोहत्या बंदी’साठी मुख्यमंत्र्यांना अडवले

cm
पंढरपूर – वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूरात गोहत्या बंदीचा कायदा आणावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. वारकऱ्यांनी महापूजेला जात असताना मुख्यमंत्र्यांना अडवले. गोहत्या बंदी करा अन्यथा; महापूजा करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर मुख्यमंत्र्यांनी गोहत्या बंदी कायद्यासाठी लवकरच ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर वारकऱयांनी आंदोलन मागे घेतले.

चार दिवसांपुर्वीच बंडातात्या कराडकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तथापि या संदर्भात कोणताही निर्णय सरकारने न घेतल्याने त्यांनी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. पंढरपूरातल्या शिवाजी चौकात बंडातात्यांच्या नेतृत्वाखालील वारकऱयांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महापूजेला जात असताना त्यांचा रस्ता रोखून धरला. यावेळी गोहत्या बंदी कायद्यासाठी आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी वारकऱयांना दिले. त्यानंतर वारकऱयांनी आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, गोहत्या बंदीचा निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बंडातात्या यांनी दिला आहे.

Leave a Comment