मुंबई : मोठा गाजा-वाजा करून राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्याने शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या दोन दिवसात राज्य सरकारने अध्यादेश न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. दरम्यान, आज सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात पुढील आठवड्याभरात आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढू असे सांगितले गेले आहे. मराठा आरक्षणाबाबत आज सुनावणी होणार होती, पण मात्र अध्यादेश न काढल्याने ती 5 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश लवकर न काढल्यास आंदोलन- विनायक मेटे
मराठा व मुस्लिम समाजाला अनुक्रमे १६ व ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात सरकारच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल झाली. सरकारने न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान वेळ मारून नेत आम्ही अद्याप अध्यादेश काढला नसल्याचे सांगितले होते. याबाबत राज्य सरकारने अद्याप अध्यादेश काढला नसल्यामुळे राज्यातील मराठा संघटनाचे नेते व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळेच मेटेंनी हा इशारा दिल्याचे मानले जात आहे.