नासा फ्लोरिडा सेंटरमधील विभागाला नील आर्मस्ट्राँगचे नाव

neil
फ्लोरिडा- नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधील ऑपरेशन अॅन्ड चेकआऊट इमारतीला चंद्रावर प्रथम पाऊल टाकणारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांचे नांव दिले जाणार असून हा नामकरण समारंभ येत्या २१ जुलैला होणार आहे.

या ऐतिहासिक इमारतीतच अपोलो ११ या चांद्रमोहिमेतील अंतराळयानाची जुळणी करण्यात आली होती. नासाच्या अंतराळ मोहिमात या विभागाचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. ही इमारत १९६४ साली बांधण्यात आली आहे. चांद्रमोहिमेवर जाण्यापूर्वी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी या इमारतीत मुक्काम केला होता. चंद्रावर पहिले पाऊल टाकण्याचा मान नील यांच्याकडे आहे. नील आर्मस्ट्राँग यांचे ऑगस्ट २०१२ मध्ये निधन झाले आहे.या नामकरण समारंभाला केनेडी स्पेस सेंटरचे संचालक रॉबर्ट कबाना, नील आर्मस्ट्राँग यांचे कुटुंबिय तसेच नील यांचे चांद्रमोहिमेतील सहकारी मायकेल कोलीन व बझ आल्ड्रीन यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

सध्या या इमारतीचा वापर ओरियन स्पेसक्राफ्टच्या प्रोसेसिंग व असेब्लीसाठी केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून भविष्यात ओरियनच्या माध्यमातून मंगळ आणि उल्कांवर संशोधनासाठी अंतराळवीरांना पाठविले जाणार आहे.

Leave a Comment