इच्छा असल्यास सापडतो मार्ग

hardwork
इच्छा असल्यास मार्ग सापडतो, पण तीव्र इच्छा असली पाहिजे. तशी असल्यास अनेकांना आपले स्वतंत्र व्यवसाय निवडता येतील. पण इच्छाच नसेल तर भांडवलाचा बहाणा तयारच आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याने अगदी अनपेक्षितपणे आपला स्वतंत्र व्यवसाय निर्माण केला. तसा तो विद्यार्थी म्हणजे टाकाऊ विद्यार्थी होता. कारण तो दहावीला नापास झाला होता. दहावी नापास होण्याचे कारण काय तर रेडिओ. त्याला रेडिओ ऐकण्याचा फार छंद होता आणि तो नेहमी विविध भारतीवर हिंदी गाणे ऐकत बसायचा. मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत नापास झाला आणि नंतर ऑक्टोबरमध्ये पुरवणी परीक्षेला बसून पास झाला. आता पुरवणी परीक्षेपासून पुढच्या वर्षी जूनपर्यंत त्याला काही काम नव्हते. मग काय, त्याला रान मोकळे सापडले. तो केवळ हिंदी गाणे ऐकत बसला. मात्र यावेळी त्याला एक नवी युक्ती सुचली. गाण्यांच्या आगेमागे काही जाहिराती लागत असत. त्याने त्या जाहिरातींची मोजणी करायला सुरुवात केली. कोणत्या कंपनीची जाहीरात कोणत्या कार्यक्रमात किती वेळा लागली याचे रेकॉर्ड तयार केले आणि कंपनीनिहाय त्याची विभागणी करून एक टेबल तयार केला.

हा टेबल तयार झाल्यानंतर त्याने त्या प्रत्येक कंपनीशी संपर्क साधायला सुरुवात केली. आपली जाहिरात विविध भारतीच्या कोणत्या कार्यक्रमात किती गाण्यांच्या अंतराने आणि किती वेळा लागली याची माहिती तो कंपन्यांना कळवायला लागला. कंपन्यांसाठी हा एक नवीनच शोध होता. या कंपन्या विविध भारतीवर आपली जाहिरात यावी म्हणून भरपूर पैसा खर्च करत होत्या. परंतु विविध भारती किंवा मध्यस्थ एजन्सी जाहिराती नक्की करतानाच्या करारात जितक्या वेळा जाहीरात लागेल असे आश्‍वासन देतात तेवढ्या जाहिराती नक्की लागतात की नाही? हे पाहण्याची कसलीही यंत्रणा जाहीरात देणार्‍या कंपन्यांकडे नव्हती आणि ती ते पाहण्यासाठी स्वतंत्र माणूस नेमून मोजणी करावी हे त्यांना परवडणारेही नव्हते. सगळ्या कंपन्या या बाबतीत अंधारात होत्या. या बेकार मुलाने मात्र त्यांच्यासाठी ही गणना केली. त्यामुळे त्यांना आपले पैसे व्यर्थ जाणार नाहीत यासाठी ते आवश्यक वाटायला लागले. त्या मुलाने घरी बसल्या बसल्या आणि आपला छंद पुरवता पुरवता हा जो उद्योग केला होता तो त्या कंपन्यांना हवाच होता. अशा २५-३० कंपन्या होत्या. त्या सगळ्यांना या मुलाने पत्रे लिहिली आणि आपल्या जाहिराती मोजण्याचे काम केल्यास काही ठराविक शुल्क त्या कंपन्याने आपल्याला द्यावे असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला.

या कंपन्यांचे दररोज काही हजार रुपये जाहिरातीवर खर्च होत होते, पण त्यांची गणती करण्यास त्यांना वेळ नव्हता. या मुलाने त्यासाठी त्यांच्याकडून दररोज शंभर रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम त्या कंपन्यांसाठी अगदी नगण्य होती. परंतु सुमारे २० कंपन्यांनी त्याचा हा प्रस्ताव मान्य केला. त्यामुळे त्याला दररोज दीड हजार रुपये मिळायला लागले आणि हे दीड हजार रुपये कमवण्यासाठी त्याला काही करावे लागणार नव्हते. उलट ज्या गोष्टीमुळे तो टाकाऊ विद्यार्थी म्हणून गणला जात होता तो त्याचा छंद पूर्ण करत करतच त्याला हे उत्पन्न मिळत होते. तो दहावी पास झाला, परंतु नाही तरी त्याने आणखी शिक्षण देऊन काय दिवे लावले असते? त्याच्या ऐवजी त्याच्या छंदाने आणि त्याच्या कल्पकतेने त्याने आपला उद्योग निर्माण केला. पुढे त्याला जाहीरात हे क्षेत्र फार आकर्षक असल्याचे लक्षात आले आणि त्याने त्यात उडी घेऊन चांगले करिअर केले. अनेक विद्यार्थी नापास झाले म्हणजे किंवा पास होऊनही नोकर्‍या मिळत नसल्यामुळे निराश अवस्थेत जीवन जगत असतात. परंतु एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आणि नंतर हातात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मागणे हाच काही जगण्याचा एकमेव मार्ग नसतो. जगात जगण्याचे मार्ग अनेक आहेत, ते शोधणार्‍यांची गरज असते. जो शोधतो त्याला तो सापडतो. पण जो शोधतच नाही आणि या जगात आता माझ्या जगण्याचे काही साधनच उपलब्ध नाही असे म्हणून निराश होऊन घरात बसतो त्याला काहीच मिळत नाही.

Leave a Comment