११ महिन्यापूर्वीच मिळणार पुराची पूर्वसूचना

flood
न्यूयॉर्क : जगाच्या पाठीवरील वेगवेगळय़ा नद्यांना येणार्‍या पुराची पूर्वसूचना आता ११ महिन्यांपूर्वीच मिळणे शक्य होणार आहे. नद्यांच्या खोर्‍यात मिनिटाला होणारे गुरुत्वात्कर्षणीय बदल उपग्रहाच्या माध्यमातून नोंदवून संभाव्य पुराची पूर्वसूचना देता येणे शक्य असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पुरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

नदीच्या खोर्‍यात किती पाणी शिल्लक आहे, यावरून कित्येक महिने अगोदरच पुराची पूर्वसूचना देणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. इर्व्हिन येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक व या अभ्यासाचे प्रमुख संशोधक जे. टी. रिगर आणि सहकार्‍यांनी २0११ मध्ये मिसौरी नदीला आलेल्या पुराविषयी हे संशोधन केले आहे. संशोधकांनी यासाठी नासाच्या जुळय़ा ग्रेस या सॅटेलाईटचा वापर केला आहे. तसेच नदीला पूर येण्यापूर्वी नदीत किती पाणी मुरले याची माहिती गोळा करीत हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मिसौरी नदीच्या पुराविषयी संशोधकांनी पाच महिन्यांपूर्वी वर्तविलेला अंदाज खरा ठरला आहे. पृथ्वीभोवती फिरत असताना उपग्रहाच्या अंतराळ कक्षेत गुरुत्वाकर्षणात किंचितसा बदल होतो. त्यामुळे अंतराळात फिरत असताना उपग्रहाच्या माध्यमातून नदी खोर्‍यातील बर्फ व पाण्याची माहिती उपलब्ध होते. उपग्रहाबरोबरच पाण्याची उपलब्धता, बर्फ, पाणी, मातीचा ओलावा आणि जमिनीतील पाणी यांच्या माहितीवरून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रस्तुतचे संशोधन ‘नेचर जियोसायन्स’ या मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. कमी विश्‍वसनीयता असल्याने केवळ अकरा महिन्यांपूर्वीचा अंदाज वर्तविणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्ष पाऊस पडण्यापूर्वीच पुराचा धोका वर्तविण्यात येईल, असे रिगर यांनी म्हटले आहे.

रिगर यांच्या टीमच्या या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुराची पूर्वसूचना मिळणे शक्य झाले तर पुरामुळे होणारी संभाव्य जीवित अथवा वित्तहानी टाळता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे जागतिक समुदायाच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

Leave a Comment