भारतात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे

india
संयुक्त राष्ट्रे – जगातली गरिबी, दैन्य, दारिद्य्र आणि आरोग्याविषयीची अनास्था या सर्वांचे उच्चाटन करून मानवतेला सुखी करण्याच्या बाबतीत संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ सालपर्यंत काही उद्दिष्ट्ये गाठण्याचे लक्ष्य ठरवले होते. परंतु भारतात या बाबतीत फारशी समाधानकारक प्रगती झालेली नाही, असे या संबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. २०१५ साल जवळ आले परंतु भारत देश याबाबतीत फार दूर असल्याचे लक्षात आले आहे.

मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स् या नावाने ही उद्दिष्ट्ये जाणली जातात आणि त्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रांनी काही उपाय योजना सूचित केल्या आहेत. त्यामध्ये गरीब लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. कारण लोकांना पिण्याचे पाणी शुद्ध न मिळाल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न गंभीर होत असतात. भारतात पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत किती निष्काळजीपणा आहे हे सर्वांना माहीतच आहे.

जगाच्या काही अविकसित भागामध्ये संयुक्त राष्ट्राच्या दारिद्य्र रेषेच्या निकषाखाली राहणारे लोक आहेत आणि त्यामध्ये भारताचा समावेश आहे. जगामध्ये १२० कोटी लोक अतीदरिद्री आहेत आणि त्यातले एक तृतीयांश लोक भारतात राहतात. पाच वर्षांच्या आत मरणार्‍या मुलांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. भारतात दरवर्षी १४ लाख लहान मुले वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच मरण पावतात.

दक्षिण आशियामध्ये म्हणजे भारतासह सात आशियाई देशामध्ये हे प्रमाण मोठे होते. मात्र याबाबतीत काही प्रगती होत आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की, ही प्रगती भारत देश सोडून सर्व देशात होत आहे. भारतात या बाबतीत अजूनही मागे आहे. अल्पवयात विवाह, अल्पवयातील मातृत्व आणि पहिल्या प्रसूतीच्यावेळी मृत्यू हा प्रकार अजूनही भारतात सर्वाधिक आहे.

Leave a Comment