पुणे नव्हे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ;राज्यमंत्री मंडळाचा निर्णय

pune-vidyapeeth
मुंबई विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने घोषणा आणि निर्णयाचा धडका लावला आहे . गेल्या 10 वर्षांपासून संघर्षात अडकलेल्या पुणे विद्यापीठाचा नामविस्ताराचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला.

शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणार्या पुणे विद्यापीठाचे नाव आता ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) विशेष बैठक घेऊन याबद्दलचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य हरी नरके यांनी या निर्णयाचे स्वागत केले . हा सावित्रीबाईंचा आणि स्त्रीवर्गाचा गौरव असल्याचं त्यांनी म्हटले आहे.पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी गेल्या 10 वर्षांपासून होत होती. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात विद्यापीठाच्या सिनेट समितीने एकमताने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. सिनेट समितीने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता.पण वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर राज्य सरकारने अखेर नामविस्तारावर शिक्कामोर्तब केले आहे. 2004 सालापासून नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला सावित्रीबाईं यांचे नाव विद्यापीठाला देण्यात यावे अशी मागणी लावून धरली होती. यासाठी अनेक आंदोलने ,मोर्चे काढण्यातही आली. अखेर राज्य सरकारने निवडणुकांच्या तोंडावर का होईना नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे .विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी विविध संघटना आणि व्यक्तींकडून होत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही अशी मागणी केली होती.पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे तर जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.

Leave a Comment