पर्यटनासाठी अख्खे गावच विक्रीला !

village
घर, प्लॉट अथवा जमीन विक्रीला काढल्याची जाहिरात तुम्ही वर्तमानपत्र अथवा संकेतस्थळांवर बघितलीच असेल. मात्र, अख्खेच्या अख्खे गावच विक्रीला काढल्याची जाहिरात तुम्ही आजवर बघितली नसेल; पण हे खरे आहे. इटलीतील एक दुर्लक्षित गाव येथील रहिवाशांनीच विक्रीस काढले असून, यासाठी ऑनलाइन खरेदी-विक्रीचे संकेतस्थळ ‘इबे’वर जाहिरातही टाकण्यात आली आहे. यात गावाची किंमत केवळ दोन कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

इटलीच्या ग्रॅन पॅराडिसो राष्ट्रीय उद्यानाजवळ आल्प्स पर्वतांच्या कुशीत वसलेले एक निसर्गसमृद्ध गाव येथील रहिवाशांनी विक्रीस काढले आहे. गावाचे रूपांतर एका पर्यटन केंद्रात व्हावे, यासाठी येथील नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे. सार्वत्रिक दुर्लक्षाचे बळी ठरलेल्या या गावात मोजके वृद्ध गावकरी शिल्लक राहिले असून, येथील संस्कृती लयास पावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. गावातील बहुतेक तरुण हे रोजगाराच्या शोधात शहरांत गेले असून, गाव जवळपास ओस पडले आहे. गावात सध्या दगडाची १४ तर इतर प्रकारची ५0 घरे आहेत. या घरांसह एखाद्या श्रीमंत व्यक्तीने हे गाव खरेदी करून त्याचा जीर्णोद्धार करावा, अशी या रहिवाशांची इच्छा आहे. मात्र, जीर्णोद्धार करताना गावातील घरांचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवण्यात यावे, अशी अट नागरिकांनी ठेवली आहे. निसर्गाच्या कुशीतील या गावात पर्यटनाचा विकास होऊन येथे समृद्धी नांदावी, यासाठी हा खटाटोप केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. गावाच्या विक्रीसाठी नागरिकांनी ऑनलाइन खरेदी-विक्रीचे संकेतस्थळ ‘इबे’वर एक जाहिरात टाकली आहे. गावाची किंमत दोन लाख पौंड (जवळपास दोन कोटी रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. गाव खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची अंतिम तारीख १५ जुलै इतकी ठेवण्यात आली आहे. आता हे गाव कोण विकत घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Comment