महाराष्ट्रात १३ ते १८ आक्टोबरला विधानसभा मतदान

vidhansabhaele
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेसाठी येत्या १३ ते १८ आक्टोबर दरम्यान मतदान घेतले जाईल असे संकेत दिले गेले असून येत्या २० जुलैला होत असलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यासंबंधीची अधिकृत घोषणा केली जाईल असे समजते. महाराष्ट्राबरोबरच झारखंड, हरियाना आणि जम्मू काश्मीरमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सात डिसेंबरला संपते आहे. त्यापूर्वी निवडणुका घेतल्या जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. सप्टेंबर आणि आक्टोबर हे सणांचे दिवस असून महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव व आक्टोबरमध्ये दिवाळी हे महत्त्वाचे सण येत आहेत. त्यामुळे बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी या दोन सणांच्या दिवसांत निवडणुका घेऊ नयेत असे सुरवातीपासूनच आयोगास सांगितले आहे. सणांच्या काळात सुरक्षा दलांची उपलब्धताही कितपत होऊ शकेल असा प्रश्न आहे. त्यामुळे गणपती आणि दिवाळी यांच्या मध्ये निवडणुका होतील असा संकेत दिला गेला आहे.

हरियानातील विधानसभेची मुदत २७ आक्टोबरला संपते आहे. त्यामुळे तेथेही त्यापूर्वी निवडणूक होणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र आणि हरियानात एकाचवेळी निवडणुका घेतल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जात असून महाराष्ट्रात या निवडणुकासाठीचे मतदान दोन किवा तीन टप्प्यांत होईल असेही समजते.

Leave a Comment