फुलपाखरांनाही संवेदना चवीची ,गंधाची !

butterfly
आपल्याला आश्‍चर्य वाटेल, पण फुलपाखरांना आणि पतंगांनाही उत्तम दर्जाची दृष्टी असते, तसेच गंध आणि चवीचीही संवेदना असते. आपल्या अपेक्षेप्रमाणे बहुतांश फुलपाखरांना चव समजणारे अवयव त्यांच्या तोंडात असतात, पण वास समजणार्‍या ग्रंथी किंवा त्याचे ‘नाक’ मात्र त्यांच्या अँटेनावर असते, तर काही फुलपाखरांना त्यांच्या पायावर असलेल्या नाकांद्वारे वास समजत असतो. अनेक फुलपाखरांना स्वत:लाच वास असतो व त्याचा उपयोग ते मादीला आकर्षित करण्यासाठी आणि शत्रूला दूर पिटाळून लावण्यासाठी करत असतात. नर फुलपाखरांना स्वत:ला जो वास असतो, तो त्यांच्या मागच्या पंखात असलेल्या कप्प्यातील खवल्यातून येत असतो. हा वास फुलांच्या वासाप्रमाणेच सुगंधी असतो. तो आपल्यालाही आवडेल असाच असतो. माद्याही त्यांच्या शरीरातील विशिष्ट ग्रंथीद्वारे काही विशिष्ट वास निर्माण करत असतात, पण तो मात्र आपल्याला आवडेल असा नसतो!

फुलपाखरांच्या चव समजणार्‍या ज्या ग्रंथी असतात किंवा जे अवयव असतात, ते माणसाच्या म्हणजेच आपल्या चव समजणार्‍या ग्रंथीपेक्षाही अधिक संवेदनाक्षम असतात. आपल्या जिभेला गोड चव जेवढी समजते, त्याहून किती तरी अधिक पट तीव्रतेने ती फुलपाखरांना समजत असते. त्यांचे मुख्य अन्न फुलातला मध हेच असते व हा मध म्हणजे साखरयुक्त द्रवपदार्थच असतो. त्यामुळे फुलपाखरे हा मध चटकन शोधू शकतात, हुडकू शकतात. जेव्हा फुलपाखराला मध सापडतो, तेव्हा ते आपली लांब जीभ उलगडते व मध शोषून घेते.

Leave a Comment