नाथांच्या पालखीशी नको दुजाभाव ;वारकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

palkhi
पंढरपूर: चंद्रभागा नदीवरील पुलाचे काम सुरू करा या मागणीसाठी एकनाथ महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरातील व्हळे गावाजवळ बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

या बेमुदत ठिय्या आंदोलनामुळे पंढरपूर तालुका प्रशासनासमोरील पेच वाढला आहे. प्रशासनाने लेखी हमी दिल्यानंतरच पालखी येथून हलविणार असल्याची भूमिका पालखी सोहळा प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी घेतली आहे.

एकनाथ महाराज यांची पालखी पैठणहून निघून पंढरपूर तालुक्यातील व्हळे येथून नदीमार्गे होडीतून कौठाळी येथे येत असते. मात्र काही वर्षापूर्वी याठिकाणी बंधारा बांधण्यात आल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. पूर्वी कमी पाणी असल्याने हे वारकरी होडी किंवा पायी नदी पार करून कौठळी येथे येत असत.या सोबतच या भागात अनेकदा होडी बुडाल्याच्या घटना घडल्याने भाविकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नदीवरील पुलाला ४ वर्षापूर्वीच मंजुरी मिळूनही १५ कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या कामास सुरुवात होऊ शकली नाही.

याबाबत वारंवार प्रशासनाला आणि मंत्र्यांना मागणी करून उपयोग होत नसल्याने या आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे गोसावी यांनी सांगितले.विदर्भ, मराठवाडा या भागातून येणाऱ्या पालखी सोहळ्याकडे प्रशासन कायमच दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही केला आहे. प्रशासन केवळ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यालाच सुविधा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Leave a Comment